कोल्हापूर : मुलाला नऊ महिने पोटात वाढविणारी आई त्याचे भले व्हावे यासाठी स्वत:चा जीव अर्पण करायलाही तयार असते. अशीच एक माऊली कर्त्या मुलास जीवनदान मिळावे यासाठी स्वत:ची किडनी द्यायला तयार झाली आहे; परंतु किडनी रोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या कुटुंबाकडे पुरेसे पैसे नाहीत म्हणून त्यांनी समाजाकडे मदतीसाठी हात पसरले आहेत. समाजाच्या दातृत्वावरच त्याच्या मुलाचे प्राण वाचणार आहेत. आरिफ दिलावर जमादार (वय २५ रा. साई गल्ली, लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. बँक आॅफ महाराष्ट्रच्या कोल्हापुरातील गंगावेश शाखेतील (अकौंट नंबर २००८३५११०६६) या खात्यावर मदत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.दिलावर जमादार हे टेलरचे काम करतात. त्यातून मिळणाऱ्या चार पैशांतून त्यांचा संसाराचा गाडा चालतो. त्यांना आरिफ हा एकुलता मुलगा व विवाहित मुलगी. आरिफने येथील न्यू कॉलेजमधून बारावी झाल्यानंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. चार महिने कसाबसा तिथे शिकला. त्यानंतर प्रकृतीचा त्रास सुरू झाल्याने त्याचे शिक्षणही थांबले. त्याच्या अगोदर तो लक्ष्मीपुरीतील एका खासगी दुकानात सेल्समन म्हणूनही चार पैसे मिळवून वडिलांना मदत करीत होता. गेल्या २३ एप्रिलपासून तो डायलेसिसवर जगत आहे. त्याचा दैनंदिन खर्च जास्त झाल्याने वडील कर्जबाजारी झाले आहेत.आरिफवर येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांनी तातडीने किडनी प्रत्यारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. त्याच्यावर पुण्यातील आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याची आई समीना या किडनी देण्यास तयार आहेत. त्यासाठी ६ लाख ८० हजार रुपयांचा खर्च आहे. हा खर्च ऐकून आई-वडिल हतबल झाले आहेत. कोणत्याही स्थितीत मुलगा वाचला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत असून त्यासाठीच समाजाकडे मदतीचे आवाहन केले आहे. ( प्रतिनिधी )
कर्त्या मुलासाठी आई देणार किडनी
By admin | Published: December 17, 2014 11:25 PM