जालना : येथील व्यावसायिक नितीन ताराचंद कटारिया यांची भरदिवसा हत्या करणारा मारेकरी सुभाष अंबादास वैद्य याच्या स्थानिक गुन्हे शाखेने कर्नाटकातून मुसक्या आवळल्या. २२ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली.शहरातील मोदीखाना भागात राहणारे व्यावसायिक नितीन कटारिया यांची १९ सप्टेंबरला घरासमोर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्याकडे सोपवला होता. घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे पोलीस यंत्रणेला मारेकरी सुभाष वैद्य (रा. घाणेवाडी) याची ओळख पटली होती. पण तो परराज्यात पळून गेला होता. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, गोवा या राज्यांत त्याचा शोध सुरू होता. शिवाय, माहिती देणाºयास २५ हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.कर्नाटक राज्यातील लोढा रेल्वे जंक्शनवर वैद्य असल्याची माहिती मंगळवारी पोलिसांना खबºयामार्फत मिळाली. त्यामुळे मागावर असलेल्या पथकाने लोढा जंक्शनवर जाऊन गोव्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सुभाष वैद्यच्या मुसक्या आवळल्या. बुधवारी पहाटे त्याला जालन्यात आणण्यात आले. प्रथम त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारनंतर न्यायालयात हजर केले असता, त्यास २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.प्लॉटच्या रजिस्ट्रीचा वाद -सुभाष वैद्यने व्यावसायिक नितीन कटारिया यांच्याकडून २०१०मध्ये सिद्धिविनायक ग्रीनसिटीमध्ये ६ हजार रुपये मासिक हप्त्यावर १२०० चौरस फुटांचे दोन प्लॉट खरेदी केले होते. परंतु हे प्लॉट १३०० चौरस फूट क्षेत्रफळ असल्याचे सांगून कटारिया यांनी ३० हजार रुपये अधिक रक्कम घेतली. रजिस्ट्री झाल्यानंतर प्लॉटचे क्षेत्रफळ कमी असल्याचे लक्षात आल्यामुळे सुभाषने ३० हजार रुपये परत करण्याची मागणी केली. यातून दोघांमध्ये वाद झाल्याने कटारियांनी जून २०१६मध्ये सुभाष वैद्यविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. हत्येच्या घटनेपूर्वी सुभाष वैद्यने कटारिया यांच्याकडै पैशाची मागणी केली. मात्र, कटारिया यांनी आॅफिसवर येऊन भेटण्यास सांगितले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कटारियांचा मारेकरी अखेर जेरबंद, कर्नाटकातून घेतले ताब्यात; स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:11 AM