Ramdas Kadam : विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी जुन्या आठवणी सांगत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याची उद्धव आणि आदित्य ठाकरेंना कल्पना नसल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
खेड तालुक्यात बीजघर येथे रविवारी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तुमचा पिल्लू मी मंत्री असताना केबिनमध्ये येऊन बसायचा, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. तसेच आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधून ५५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलं त्याच मला प्रायश्चित काय मिळालं असा सवालही रामदास कदम यांनी केला.
"ही शिवसेना अशी मोठी झाली नाही, त्यासाठी आजवर अनेकांनी रक्त सांडले आहे. बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी अनेक लोक जीव द्यायला तयार असायचे. त्यांना इतकं प्रेम त्या मातोश्रीवरती मिळत होतं. शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. हजारो माता भगिणींचे कुंकू पुसलं गेलं. मराठी माणसांचे न्याय हक्कासाठी स्थापन केलेली बाळासाहेबांची ही शिवसेना अशी मोठी नाही झाली आणि ही शिवसेना मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठे योगदान कोणाचा असेल तर ते कोकणाचा आहे, त्याच कोकणी माणसाला कोकणातल्या नेतृत्वाला संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही," अशा शब्दात रामदास कदम यांनी टीका केली.
"मी मंत्री असताना उद्धवजी तुमचा तो पिल्लू आदित्य ठाकरे माझ्या केबिनला येऊन बसायचा. माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायचा, काय-काय काम चालतं कसं ते सगळं शिकून घेतलं, मला काका काका म्हणायचा आणि काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. काकाचं खातं घेऊन बसला तुमचा मुलगा आदित्य ठाकरे. आता हाच आदित्य ठाकरे टुणटुण उड्या मारत लोकांना शहाणपणा शिकवतो आहे. अरे कसले पन्नास खोके. एका जरी आमदाराने पन्नास खोके घेतले असतील हे जर सिद्ध केले, तर मी तुमच्या घरी येऊन भांडी घासेन. नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या," असं आव्हान रामदास कदम यांनी दिलं.