कोल्हापूर : ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं...’चा गजर, गुलाल-खोबऱ्याची उधळण, दवणाचा मान, मानाच्या शेकडो गगनचुंबी सासनकाठ्यांची लयबद्ध मिरवणूक, हलगी, ताशा, तुतारींच्या तालावर नृत्य करणारे सासनकाठीधारक आणि हा अलौकिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी आलेल्या सहा लाखांहून अधिक भाविकांच्या मांदियाळीत ‘दख्खनचा राजा’ श्री जोतिबाची चैत्र यात्रा वाडी रत्नागिरी येथील डोंगरावर सोमवारी मोठ्या उत्साहात आणि मंगलमयी वातावरणात पार पडली. महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘महाराष्ट्रात यंदाही चांगला पाऊस होऊ दे , शेतकरी कर्जमुक्त करण्यासाठी शासनाला बळ दे’ असे साकडे देवा जोतिबाला घातले.महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटकसह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री जोतिबाची चैत्र यात्रा म्हणजे वर्षातला सर्वांत मोठा सोहळा. यानिमित्त सोमवारी पहाटे पाच वाजता तहसीलदार रामचंद्र चोबे यांच्या हस्ते श्री जोतिबा देवास अभिषेक करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी अजित पवार, व्यवस्थापक लक्ष्मण डबाणे उपस्थित होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मंदिरात आगमन झाले. देवाचे दर्शन घेतल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारात त्यांच्या हस्ते निनाम पाडळीच्या मानाच्या पहिल्या सासनकाठीचे व विहे गावच्या दुसऱ्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी आमदार सतेज पाटील, सत्यजित पाटील, शंभूराजे देसाई, बाळासाहेब पाटील, ‘पुणे म्हाडा’चे अध्यक्ष समरजित घाटगे, वाडी रत्नागिरीच्या सरपंच डॉ. रिया सांगळे, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार, पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार, सदस्य बी. एन. पाटील-मुगळीकर, शिवाजी जाधव, प्रमोद पाटील, संगीता खाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दुपारी दोन वाजता तोफेच्या सलामीनंतर मंदिर परिसरातून मानाच्या १०८ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगी, ताशांच्या कडकडाडात आणि लव्याजम्यानिशी निघालेल्या या मिरवणुकीत गुलाली भक्तीचे रंग भरले. दुसरीकडे संपूर्ण मंदिर परिसर गुलालात न्हाऊन निघाला होता. आबालवृद्ध कुटुंबीयांसमवेत देवाचे दर्शन घेऊन मार्गस्थ होत होते. जोतिबा डोंगरावरील प्रत्येक घरात भाविकांची सरबराई केली जात होती. संध्याकाळी साडेपाच वाजता ‘श्रीं’च्या पालखी सोहळ््याला सुरुवात झाली. मिरवणुकीने पालखी यमाई मंदिराच्या परिसरात गेली. येथे धार्मिक विधी झाल्यानंतर रात्री आठ वाजता पालखी पुन्हा मंदिराकडे रवाना झाली. रात्री १० वाजता श्री केदारलिंगाची आरती, धुपारती होऊन यात्रेच्या मुख्य कार्यक्रमाची सांगता झाली. देवालय रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. यानिमित्त डोंगरावर मांडण्यात आलेल्या स्टॉल्सवर भाविकांनी खरेदीचा आनंद लुटला. प्रशासनाचे चोख नियोजन संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा पोलिस व वाहतूक प्रशासनाने यात्रेचे चोख नियोजन केले होते. मंदिर प्रवेश व बाहेर येण्यासाठी स्वतंत्र मार्ग केल्याने गोंधळ, धक्काबुक्की, चेंगराचेंगरी असे अनुचित प्रकार घडले नाही. भाविक कोणताही त्रास न होता मंदिर व बाह्य परिसरात फिरुन यात्रेचा आनंद घेत होते. वाहनांचे पार्किंग, एकेरी वाहतूक, मुख्य रस्त्यावर पार्किंग बंदी, दानवडे फाट्यापासून बससेवा, त्यात स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य यामुळे पाच-सहा लाख भाविकांची गर्दी असली तरी ताण जाणवला नाही. महापालिकेची चोवीस तास सेवाकोल्हापूर महानगरपालिकेने जोतिबा यात्रेसाठी आलेल्या भाविकांना चोवीस तास सेवा दिल्या आहेत. जोतिबा यात्रेला येणाऱ्या भाविकांची पंचगंगा नदीत स्नान करण्याची प्रथा आहे. यापूर्वी नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने भाविकांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नदीकाठावर शॉवरची व्यवस्था करण्यात आली. तात्पुरती मोटार बसून एकावेळी पन्नासहून अधिक भाविकांना अंघोळ करता येईल, अशी यंत्रणा उभी केली आहे. महिलांच्या अंघोळीची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून त्यासाठी पत्र्याची मोठी शेड उभी केली आहे. महिलांना कपडे बदलण्याकरिताही स्वतंत्र कक्ष उभे केले आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशमन दलाची गाडी, रुग्णवाहिका तसेच जवानांसह स्वीमर्स पुरेशा साहित्यासह तैनात करण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी बल्बची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले आहे. डॉक्टर्स, नर्स तसेच औषधसाठाही त्यांना देण्यात आला असून सोमवारी दिवसभरात १३५ जणांवर उपचार करण्यात आले. भाविकांच्या सोयीकरिता वीस सीटचे फिरते शौचालय येथे उभारण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याचीही खास व्यवस्था करण्यात आली आहे.देवस्थानतर्फे ४० बसेसची सोय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही के.एम.टी.कडून ४० बसेस आगाऊ भाडे भरुन मागविण्यात आल्या होत्या. या बसेसमधून गिरोली फाटा व दानेवाडी फाटा येथेपर्यंत दुचाकीवरून येणाऱ्या भाविकांना डोंगरावर घेऊन जाण्याची सोय करण्यात आली होती. त्यानुसार दोन्ही ठिकाणांहून प्रत्येकी २० बसेस दिवसभर भाविकांची ने-आण करीत होत्या.२४ तास पाण्याची सोय जोतिबा यात्रेनिमित्त जिल्हा प्रशासनाने केलेली पाण्याची सोय अपुरी होती. मात्र, प्रजासत्ताक सामजिक संस्थेच्यावतीने यंदा भाविकांना चोवीस तास शुद्ध पाण्याची सोय सेंट्रल प्लाझा परिसरात करण्यात आली होती. यासाठी अध्यक्ष दिलीप देसाई, अभिजित राऊत, सुशील कोरडे यांच्यासह ५० हून अधिक स्त्री-पुरुष कार्यकर्ते कार्यरत होते. भाविकांकडून कर्जमाफीच्या घोषणा मानाच्या पहिल्या सासनकाठीनंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील विहे गावच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सासनकाठीचे पूजन करत असताना गावकऱ्यांनी जोतिबाच्या नावानं चांगभलं म्हणतानाच शेतकऱ्यांना कर्जमाफी झालीच पाहीजे, अशा घोषणा दिल्या. दुसरीकडे राधानगरीहून आलेल्या सासनकाठीवर कॅशलेस सासनकाठी असा फलक लावण्यात आला होता. त्यामुळे बदलत्या राजकीय धोरणांचा परिणाम यात्रेवरही झाल्याचे दिसून आले. सायंकाळपासूनगर्दी वाढलीजोतिबा यात्रेनिमित्त सासनकाठी पूजेच्या दरम्यान लाखो भाविक जोतिबा डोंगर (वाडी रत्नागिरी) येथे पोहोचतात. मात्र, यंदा गर्दीचा ओघ कमी दिसला, तर सायंकाळी पालखीवेळी अनेक भाविक डोंगराकडे रवाना झाले. त्यामुळे हा गर्दीचा ओघ वाढल्याने सायंकाळी डोंगर, मंदिर परिसरात भाविकांना पाय ठेवण्यास जागा उरली नाही. विशेष म्हणजे भाविकांनी उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी सायंकाळी जाणे पसंत केले.सासनकाठीची शतकी परंपरा गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील बच्चाराम मगदूम (बावडेकर) यांनी श्री जोतिबाच्या सासनकाठीची गेल्या शंभर वर्षांपासून परंपरा जोपासली आहे. रामू बावडेकर यांच्या जन्मापासून सुरू झालेली ही परंपरा त्यांचे वारस बच्चाराम, अमर आणि कृष्णात मगदूम यांनी कायम राखली आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी सासनकाठी उभी केली जाते. श्री जोतिबाच्या यात्रेदिवशी ती वाडी रत्नागिरी येथील मंदिरात नेली जाते.अक्षयतृतीयेदिवशी सासनकाठी उतरविण्यात येते, अशी माहिती बच्चाराम मगदूम यांनी दिली.‘सहज सेवा’चा दीडलाख भाविकांना लाभसहज सेवा ट्रस्टच्यावतीने भाविकांना दिवस-रात्र जेवण, चहा, नाश्ता दिला जातो. यंदा शनिवारपासून या अन्नछत्राचा लाभ दीड लाखांहून अधिक भाविकांनी घेतला. यासाठी ४५० हून स्त्री, पुरुष कार्यकर्ते व कर्मचारी राबत आहेत. पोलिस, जिल्हा प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांना जेवणाची दोन्ही वेळेची पॅकेटही पुरविण्यात येत होती. याशिवाय बैलगाड्या घेऊन येणाऱ्या भाविकांच्या बैलजौड्यांसाठी १२०० किलो गहू भुसा व १२०० किलो पेंड वाटण्यात आली.शिवाजी तरुण मंडळशिवाजी चौक तरुण मंडळातर्फे पंचगंगा घाट येथे गेले दोन दिवस सुरू असलेल्या अन्नछत्राचा लाभ ६० हजार भाविकांनी घेतला. गेली २३ वर्षे मंडळ यात्रेकरूंची सेवा करत आहे. यासाठी माजी महापौर नंदकुमार वळंजू, रघू जगताप, प्रमोद सावंत, दिलीप खोत, सुहास भेंडे यांच्यासह २०० कार्यकर्ते कार्यरत आहेत.आर. के. मेहता ट्रस्टआर. के. मेहता ट्रस्टच्यावतीने जोतिबा डोंगर परिसरात अन्नछत्रातून सोमवारी सकाळपासून ७५ हजार भक्तांनी लाभ घेतला, तर सायंकाळी १० हजार भक्तांना भडंग वाटण्यात आले. यासाठी अध्यक्ष आर. के. मेहता, उपाध्यक्ष अनिल घाटगे, जगदीश हिरेमठ, बाळकृष्ण कांदळकर, अशोक माने, उदय मराठे, मोहन हजारे, व्ही. बी. शेटे, आदी कार्यरत होते. वारणा उद्योग समूहवारणा उद्योग समूहाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही पहाटे साडेतीन वाजल्यापासून प्रथम शिरा वाटप करण्यात आला, तर सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत प्रसादाचे वाटप केले जात होते. याचा लाभ ७५ हजारांहून अधिक भक्तांनी घेतला.
‘दख्खनचा राजा’ गुलालात न्हाला!
By admin | Published: April 11, 2017 12:16 AM