लक्ष्मण मोरे, पुणेअक्षयतृतीयेपासून आमरस चाखण्याची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात फळांच्या राजाची मागणी एकदम वाढत असल्याने कार्बाइडचा वापर करून आंबा पिकविला जात असल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आले आहे. लोकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासनाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळबाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर आंबा पेट्यांच्या हंड्या लावलेल्या आहेत. गोणपाटांनी झाकलेल्या या पेट्यांचे ढीगच्या ढीग येथे पाहायला मिळतात. या पेट्यांमध्ये कार्बाइड पावडरच्या पुड्या टाकल्या जातात. कार्बाइड पावडरमुळे उष्णता निर्माण होऊन आंबा लवकर पिकतो. हाच आंबा फळ विक्रेत्यांमार्फत घराघरात जातो. आवडीने खाल्ला जाणारा हा आंबा नैसर्गिकरीत्या नव्हे, तर कृत्रिम पद्धतीने पिकवण्यात आल्याची लोकांना कल्पनाही नसते. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने सोमवारी बाजार समितीमधील काही गाळ्यांवर फिरून गोणपाटाची पोती लावून उभारलेल्या हंड्या पाहिल्या. त्याचे छायाचित्रणही केले. त्यात काही गाळ्यांच्या बाहेर मात्र कार्बाइडच्या खाकी रंगातल्या पुड्या आढळल्या. काही गाळ्यांच्या पोट माळ्यावर अशाप्रकारे आंबा पिकवण्याचा प्रकार सुरू होता. केळी बाजारामधील गाळ्यांबाहेरही कार्बाइडच्या पुड्या आढळल्या.
‘कार्बाइड’वर पिकतो फळांचा राजा !
By admin | Published: April 21, 2015 1:20 AM