नामदेव मोरे, नवी मुंबई अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेमध्ये एप्रिलपर्यंत तब्बल ९ लाख १६ हजार पेट्यांची आवक कमी झाली आहे. परराज्यातील आवकही चार पट घसरली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी तब्बल ७४ हजार पेट्यांची आवक झाली आहे. मागील आठवड्यात आवक ८० हजारपेक्षा जास्त झाली होती. हा आकडा मोठा असला तरी तो गतवर्षीच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. प्रत्येक वर्षी २० एप्रिल ते १० मे दरम्यान हंगाम तेजीत असतो. या दरम्यान १ लाखपेक्षा जास्त पेट्यांची आवक होत असते. सव्वालाख पेटीपर्यंत विक्रमी आवक गतवर्षी झाली होती. यावर्षी एकदाही आवक एक लाखपर्यंत पोहचलेली नाही. २०१४ च्या हंगामामध्ये फेब्रुवारी ते जूनपर्यंत तब्बल पेटी, बॉक्स, करंडे, ट्रंक मिळून ६७,३०,७५३ एवढी आवक झाली होती. एप्रिलपर्यंत २७ लाख ९७ हजार ७८४ एवढी आवक होती. यावर्षी मात्र हा आकडा १८ लाख ८० हजार ९६१ वर आला आहे. यात तब्बल ९ लाख १६ हजारचा फरक पडला आहे. एपीएमसीमध्ये गेल्यावर्षी एप्रिलपर्यंत ७ लाख ५१ हजार ७५० बॉक्सची आवक झाली होती. यावर्षी १ लाख ७४ हजार ९१६ बॉक्सचीच आवक झाली आहे. फळांचा राजा मार्केटवर रुसला असून अवकाळी पाऊस व खराब हवामानामुळे हा परिणाम झाला आहे. देवगड, वेंगुर्ला, मालवण परिसरातील आंबा १५ ते २० मेपर्यंत टिकेल. १५ मेनंतर गुजरातवरून आंब्याची आवक सुरू होणार आहे. सद्यस्थितीमध्ये कर्नाटकमधूनही आंब्याची आवक होत आहे. आवक कमी असल्यामुळे बाजारभाव तेजीत आहेत. एपीएमसीमध्ये हापूस आंबा २०० ते ७०० रुपये डझन दराने विकला जात असून किरकोळमध्ये हेच दर ३०० ते ९०० रुपये डझन दराने विकले जात आहेत. हापूस व्यतिरिक्त बदामी, तोतापुरी, लालबाग,केसर, पायरीचीही आवक सुरू आहे.यावर्षी मे सुरू झाला तरी बाजारभाव जास्तच आहेत. यापुढेही भाव खूप कमी होण्याची शक्यता नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचा राजा मार्केटवर रुसला
By admin | Published: May 05, 2015 1:27 AM