असुविधेमुळे तिकिटे रद्द : २० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश
पुणे : एका व्यावसायिकाला विमान सेवा पुरविण्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी धरत ग्राहक मंचाने किंगफिशर एअरलाईन्सने व्यावसायिकाला मानसिक त्रासापोटी २० हजार १४७ रूपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे. नयन ज्योती बर्मन हे कुटुंबासोबत पुण्याहून ते गुवाहाटीला जाणार होते. यासाठी त्यांनी किंगफिशर एअरलाईन्सच्या कोरेगाव पार्क येथील शाखेतून ३ तिकिटे आरक्षित केली होती. यासाठी त्यांनी १० हजार १४७ रूपये भरले होते. मात्र, किंगफिशर एअरलाईन्सच्या अंतर्गत असुविधेमुळे ही तिकिटे रद्द झाली. त्यामुळे बर्मन यांनी त्यांच्या तिकिटांची रक्कम रिफंड करण्याची विनंती कंपनीकडे केली. एअरलाईन्स कंपनीने सुरूवातील रिफंड करण्याची तयारी दाखविली मात्र सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांनी पैसे परत दिले नाही. त्यामुळे बर्मन यांनी २६ डिसेंबर २०१३ रोजी ग्राहक मंचाकडे तक्रार केली. तिकिटाची प्रत, रद्द केलेल्या तिकिटांची प्रत बर्मन यांनी मंचाकडे सादर केली. कंपनीने मात्र सेवेत काहीही कसूर राहिली नाही, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा सादर केला नाही. यामुळे ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात व सदस्य गीता घाडगे यांनी पुराव्यांचे अवलोकन केले व कंपनीने योग्य पद्धतीने सेवा दिलेली नाही, त्यात कसूर ठेवल्याचे मान्य केले. बर्मन हे त्यांच्या तिकिटाचे १० हजर १४७ रूपये परत मिळण्यास पात्र आहेत़ तसेच त्यांना मानसिक त्रासासाठी कंपनीने १० हजार रूपये देण्याचेही आदेशात नमूद केले. एकूण २० हजार १४७ रूपये ६ आठवड्यांत परत करावे आणि तसे न केल्यास तक्रार दाखल झाल्यापासून ९ टक्के व्याजाने ही रक्कम परत करावी लागेल असे ही आदेशात नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)