मुंबई - नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावारण तापण्यास सुरूवात झाली आहे. त्यातच आता औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. युतीत हा मतदार संघ शिवसेनेकडे तर आघाडीत काँग्रेसकडे आहे. मात्र या मतदार संघात पक्षीय बलाबल पाहिल्यास एमआयएम आणि अपक्ष किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील महानगरपालिका, नगर पालिका आणि जिल्हा परिषद सदस्य विधान परिषदेवर आमदार निवडून देतात. या मतदार संघासाठी १९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. संख्याबळावरून भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी ही निवडणूक काहीशी सुकर मानली जाते. परंतु, विजयासाठीच्या आकडा गाठण्यासाठी युतीला देखील काही अपक्षांची गरज भासू शकते.
औरंगाबाद-जालना मतदार संघात एकूण काँग्रेसकडे १६७, भाजपकडे १५९, शिवसेनेकडे १३९, राष्ट्रवादी ८३, एमआयएम २७ आणि अपक्ष ४१ मतं आहेत. एकूण ६१६ पैकी ३०९ मते विजयासाठी हवे आहेत. या आकडेवारून शिवसेना उमेदवाराला विजयासाठी अपक्षांच्या मतांची गरज भासणार आहे. तर काँग्रेस उमेदवाराला एमआयएम आणि अपक्ष मतांची मोट बांधावी लागणार आहे. त्यामुळे उभय पक्षांकडून शक्तीशाली उमेदवाराचा शोध सुरू आहे.
झांबड, खोतकर यांच्या नावांची चर्चा
काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष झांबड पुन्हा एकदा विधान परिषदेच्या या जागेसाठी काँग्रेसकडून इच्छूक आहेत. मागील निवडणुकीचा अनुभव आणि ही जागा कायम राखण्यासाठी काँग्रेसकडून झांबड यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेकडून अर्जुन खोतकर यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांचे नावही शर्यतीत आहे. त्यामुळे शिवसेना या दोघांपैकी एकाला संधी देणार की, तिसराच कोणी तरी बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.