भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत किरण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:40 PM2022-10-14T18:40:29+5:302022-10-14T18:42:50+5:30
मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई - काँग्रेस नेते किरण पाटील यांनी आज हजारो शिक्षकांसह काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. किरण पाटील यांच्या प्रवेशाने आता भाजपची शिक्षक संघटणांमधील पकड वाढणार आहे.
मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा गड मानल्या जाणाऱ्या या शिक्षक आमदार मतदार संघात भाजपकडून जबरदस्त मोर्चेबांधणी सुरू आहे. मराठवाड्यातील शिक्षक संघटनांमध्ये किरण पाटील यांच्या माध्यमातून भाजपची जोरदार एन्ट्री झाली आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल -
मराठवाड्यातील ८ ही जिल्ह्यांतील विविध शिक्षक संघटनांचे सदस्य आणि पदाधिकारी भाजपत सामील झाले आहेत. किरण पाटील यांचा पक्ष प्रवेश आज झाला. त्यांच्या रुपात प्रचंड ताकदीचा कार्यकर्ता भाजपला मिळाला आहे. किरण पाटील यांना आम्ही मराठवाड्यात शिक्षक नोंदणी अभियानाचे प्रमुख केले आहे. मराठवाड्यात अनेक दिवसांत शिक्षक मतदार संघ जिंकलेला नाही. यामुळे त्यांना आम्ही ही जबाबदारी दिली आहे. त्यांना संपूर्ण रणांगण दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता कामाला लागण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.