रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू असतानच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याने खळबळ उडालेली आहे. त्यात आता किरण सामंत यांच्या नॉट रिचेबल होण्यावरून राजकारण सुरू झालं असून, ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी काय तो इशारा समजून जावा, असं विधान केलं आहे. तर आमदार वैभव नाईक यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मात्र किरण सामंत यांचे बंधू आणि राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी मात्र किरण सामंत हे ग्रामीण भागात असून, तिकडे रेंज नसल्याने त्यांच्या फोन लागत नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत असलेल्या मतदारसंघांमध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, आज सकाळी मतदानाला सुरुवात होताच किरण सामंत हे नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकताच महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. तर ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. ज्या निवडणुकीला नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय उभे असतात ती निवडणूक दहशत, दादागिरी आणि धाकदपटशाही करणारी असते. किरण सामंत हे कुठल्यागी दादागिरीला, धमकीला भीक घालणारे नाही आहेत. ते लढवय्ये आहेत. ज्याअर्थी ते गप्प बसले आहेत. त्याअर्थी त्यांचे मतदार आणि कार्यकर्त्यांनी इशारा समजून घेतला पाहिजे, असं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
तर याबाबत प्रतिक्रिया देताना वैभव नाईक म्हणाले की, किरण सामंत हे कालपासून नॉट रिचेबल आहेत. आज आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र देऊन किरण सामंत यांना निवडणुकीनंतर ताबडतोब संरक्षण देण्यात यावं, अशी मागणी केली आहे. या आधी या मतदारसंघात दहशतवादाच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे मतदान शांततेत झाल्यानंतरसुद्धा काही होऊ नये, यासाठी पोलिसांनी किरण सामंत यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण द्यावं, असे वैभव नाईक यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या सर्व घटनाक्रमावर उदय सामंत यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. किरण सामंत हे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे त्यांचा फोन लागत नाही आहे. असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी दिलं आहे.