मुंबई : भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे गेल्याकाही दिवसांपासून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर शिवसेनेसोबत जाण्याबाबातीत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानांवरून सोमय्या यांनी त्यांचे आभार मानत चिमटे काढले आहे.
मुख्यमंत्रिपदावरून तीव्र मतभेद झाल्यानंतर शिवसेनेने भाजपाशी असलेली महायुती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले आहे. दरम्यान, शिवसेनेने यावेळीच नाहीतर 2014 मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.
तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सीएए, एनआरसी, एनपीआर च्या विरोधात सर्वपक्षीय बेमुदत धरणे आंदोलनावेळी बोलताना, मुस्लिमांच्या आग्रहामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत आघाडी केल्याचे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते.
अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन्ही नेत्यांनी केलेल्या या विधानावरून भाजपने शिवसेनेवर टीका केली होती. तर शिवसेना 2014 पासून काँग्रेसचा मागे आणि काँग्रेस मुस्लिमांसाठी, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. खरं बोलण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांचे धन्यवाद असे म्हणत त्यांनी या दोन्ही पक्षाला खोचक टोला लगावला.