भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पूत्र नील सोमय्यांसह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर फोटो पोस्ट करून त्यांनी उद्धव ठाकरेंना माफिया मुख्यमंत्री म्हटले. यावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप नोंदविला आहे.
मंत्रालयात आज 'रिक्षावाला' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्री ना हटविल्या बद्दल अभिनंदन केले, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. परंतू यावरून आता शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. किरीट सोमय्या यांनी माफिया असा शब्द वापरणे चुकीचे असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.
यावर स्पष्टीकरण देताना सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंनी मला, माझ्या कुटुंबाला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली होती. नवनीत राणांना तुरुंगात टाकले होते. यामुळे मी त्यांना माफियाच म्हणतो, असे ते म्हणाले. तर केसरकर यांनी यावर आक्षेप घेत आमच्यात मतभेद असले तरी उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत टीका करायची नाही असे ठरविलेले आहे. किरीट सोमय्या जे बोलले आहेत ते आक्षेपार्ह आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी मी यावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतू होऊ शकला नाही. परंतू देवेंद्र फडणवीसांना आक्षेप कळविला आहे. त्यांना किरीट सोमय्यांना आवर घालण्यास सांगितले आहे. आमच्यात जे काही ठरले आहे, त्यानुसार भाजपा नेत्यांनी वागावे, असे फडणवीसांना सांगितले असल्याचे केसरकर म्हणाले.