मुंबई : राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? देश तर सगळ्यांचा आहे, सगळ्यांसाठी आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखनऊ शहरात एका कार्यक्रमात बोलताने केले. तर शरद पवारांनीराम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत करणे चुकीचे असल्याचं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
अयोध्येत मंदिर बांधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बुधवारी दिल्लीत पहिली बैठक पार पडली. त्याचवेळी उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी मोदी सरकारला मशिदी बांधण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची मागणी केली. जर राम मंदिर बांधण्यासाठी ट्रस्ट बनवण्यात येते, मग मशीद बांधण्यासाठी ट्रस्ट का बनवत नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.
यावरून आता भाजपच्या नेत्यांनी पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवार यांनी राम मंदिराची तुलना बाबरी मशिदसोबत केली याचं दुःख वाटत असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयने निर्देश दिले आहे, देशातील सव्वाशे कोटी लोकांची भावना आहे, राम जन्मभूमीवर रामाचे भव्य मंदिर बनवायला हवे. मात्र काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेला मुस्लिमांसाठी काही वेगळ करायचं असेल तर त्यांनी ते करावं, मात्र रामाची तुलना बाबरसोबत केल्याच कधीच मान्य केलं जाणार नसल्याचे सोमय्या म्हणाले.