मुंबई : राज्यात विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 6 फेब्रुवारीला ‘लोकमत’ला दिली होती. मात्र मोफत वीज या निर्णयावरून महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांमध्ये एकमत नसल्याचे पाहायला मिळत आहे. तोच धागा पकडून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सोमय्या यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, 100 युनिटपर्यंत मोफत वीज देणार नसल्याचे अजित पवार सांगत आहे. मात्र मोफत वीज दिल्या शिवाय राहणार नसल्याचे नितीन राऊत म्हणतायत. दुसरीकडे ५९२७ कोटी रुपयांचा दरवाढीचा प्रस्ताव सुद्धा देतात. काय मजा चालली आहे ठाकरे सरकार ची, असा खोचक टोला त्यांनी यावेळी सरकाराला लगावला.
दरम्यान दिल्लीच्या धर्तीवर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन महिने 75 पेक्षा कमी युनिट वापरणाऱ्यांकडून वीज बील घेतले जाणार नाही, अशी घोषणा आज करण्यात आली. ममता बॅनर्जी सरकारने आज आपला अर्थसंकल्पा सादर केला असून त्यात ही घोषणा करण्यात आली आहे.