मुंबई: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या एका फोटोनं राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. त्याचाच एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) यांनी जोरदार टीका केली आहे.
नांदेडमध्ये मीडियाशी संवाद साधताना मलिक यांनी किरीट सोमय्या यांच्यावर जहरी टीका केली आहे. 'किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल आहे. चर्चेत राहण्यासाठी आयटम गर्लचा कार्यक्रम सुरू आहे', अशी टीका मलिकांनी केली आहे. मलिकांच्या या वादग्रस्त टीकेने आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मलिकांच्या टीकेला किरीट सोमय्या काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागून आहे.
सरकारला कशाची भीती?दरम्यान, सोमय्या यांनी राज्यातील सरकारला भीती कशाची वाटतेय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? आम्हाला वेगवेगळ्या स्तरातून घोटाळेबाजांची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती आहे. माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केले आहेत. आता आणखी एक गुन्हा दाखल करतील, असं किरीट सोमय्या म्हणाले.
त्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीससोमय्यांच्या या कृतीवर काँग्रेसनं आक्षेप घेत, चौकशीची मागणी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत सोमय्यांना फाईल दाखवणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नगरविकास खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.