मुंबई – राणा दाम्पत्यांविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर पोलिसांनी राणा दाम्पत्यांना खार पोलीस स्टेशनला आणलं. याठिकाणी दोघांविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र राणा दाम्पत्यांना भेटण्यास खार पोलीस स्टेशनला गेलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला. सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक केली त्यात सोमय्या जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भाजपा कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मुंबईत भाजपाविरुद्ध शिवसेना संघर्ष पाहायला मिळत आहे.
यातच भाजपा आमदार नितेश राणे(BJP Nitesh Rane) यांनी ट्विट करत शिवसेनेला इशारा दिला आहे. नितेश राणे ट्विटमध्ये म्हटलंय की, जर दरदिवशी पोलिसांच्या संरक्षणाखाली भाजपा नेत्यांवर हल्ला होत असेल तर त्याला शौर्य म्हणत नाहीत. ‘मातोश्री’त बसलेल्या मर्द म्हणवणाऱ्यांनी पोलिसांना २४ तासांसाठी बाजूला ठेवावं, मग आम्ही हे सगळे हे थांबवू याची खात्री आहे. राज्य सरकार पुरस्कृत गुंडगिरी अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री, गृह सचिवांना पत्र लिहिणार
किरीट सोमय्या यांचावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी" होम सेक्रेटरी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहिणार असून जबाबदारी न पाळणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) करणार आहे. फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्या हे झेड प्रोटेक्शनमध्ये आहेत. किरीट सोमय्या यांनी अधिकृतपणे पोलिसांना कळवलं होतं मी भेटायला येत आहे. भेट झाल्यानंतर खार पोलीस स्टेशनबाहेर ७० ते ८० जणांचा जमाव असून तो माझ्यावर हल्ला करणार आहे. तुम्ही रोड क्लिअर करा, मी बाहेर जातो असंही पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांनी कुठलीही कार्यवाही न करता शिवसैनिकांच्या गुंडांना हल्ला करण्याची परवानगी दिली असा आरोप फडणवीसांनी केला.
शिवसैनिकांनी हल्ला केला नाही - शिवसेना
शिवसेना नेते आणि माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर(Vishwanath Mahadeshwar) यांनी या किरीट सोमय्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सोमय्या यांनी शिवसैनिकांवर गाडी घातल्याचा आरोप महाडेश्वर यांनी केला आहे. तर शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला नाही असं ते म्हणाले. सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पोलीस उद्धव ठाकरेंच्या घरचे नोकर आहेत का? जोपर्यंत खार पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोवर घटनास्थळावरून हलणार नाही. जोपर्यंत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे घटनास्थळी पोहचत नाहीत तोवर जागा सोडणार नाही. माझी हत्या करण्यासाठी हल्ला करण्यात आला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्यांनी केला आहे.