नवाब मलिक हे दाऊद गँगचे सदस्य आहेत हे सिद्ध झाले आहे. जेलमध्ये गेल्यानंतर नवाब मलिक यांना मंत्रीपदी कायम ठेवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पण डी गँगशी संबंध आहेत का, या बाबत उद्धव ठाकरे यांनी खुलासा करावा, असे आव्हान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिले आहे.
शरद पवार आणि दाऊद यांचे संबंध आहेत, हे उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरेंनी हजार वेळा सांगितलं असेल. मुख्यमंत्रीपदाची खुर्ची वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी पार्टनरशिप केली. त्यांची दाऊदशीपण पार्टनरशीप आहे का, असा सवाल करत उद्धव ठाकरेंना शरद पवारांविरोधात न्यायालयात मोर्चा काढण्यास सोमय्या यांनी सांगितले.
गोवा वाला कंपाऊंडमध्ये जे आर्थिक व्यवहार झाले, ती करोडो रुपयांची संपत्ती काही लाखांत मलिकना कशी काय मिळाली? हे कसे शक्य होऊ शकते? असा सवालही सोमय्या यांनी केला. मातोश्रीपासून चार किमीवर गोवावाला कंपाऊंड आहे. उद्धव ठाकरे यांचे एजंट यशवंत जाधव यांनी गेल्या काही वर्षांत जुन्या बिल्डिंग विकत घेतल्या आहेत. नवाब मलिक यांना वाचवणारे उद्धव ठाकरे यांना उत्तर द्यावे लागणार आहे. बाळासाहेबांची भाषणे मी स्वतः स्टेजवर बसून ऐकली आहेत. 1992, 93 मध्ये बॉम्ब स्फोट, दंगली झाल्या त्यानंतर शरद पवार आणि दाऊद एका विमानात गेले, अशी भाषणं मी ऐकली आहेत. मुलाने सगळेच गहाण ठेवायचं हे फक्त उद्धव ठाकरेच करू शकतात, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.
आणखी एका नेत्यावर कारवाई सुरु झाली आहे. ईडीने कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. चार-पाच जण आहेत, त्यांच्यापैकी कोणा एकाचा पुढचा नंबर लागणार असा इशारा सोमय्या यांनी दिला.