मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे बंधू नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांनतर विरोधकांकडून नवाब मलिक यांच्यावर सुद्धा टीका करण्यात आली होती. तर याच मुद्यावरून आता भाजपचे नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून भाजपचे नेते किरीट सोमय्या हे याप्रकरणी पोलिसात तक्रार करणार आहे.
कुर्ला येथे रस्त्याचे काम सुरु होते. त्या ठिकाणी 4 कामगार पाईपमध्ये वायर टाकायचे काम करत होते. त्याठिकाणी प्रभाग क्रमांक 70 चे नगरसेवक कप्तान मलिक यांनी कामगारांकडे कामाच्या ऑर्डरची विचारणा केली. मात्र, कामगारांनी कोणतीही ऑर्डर दाखवली नाही. त्यानंतर मलिक यांनी कामगारांना मारहाण केली असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडीओ जवळपास 1 महिन्यापूर्वीचा असल्याचं सांगितलं जात आहे.
याप्रकरणी आता भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून कप्तान मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या बाबतीत किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर व्हिडिओ शेयर करत, रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांना कप्तान मलिक यांनी अमानुष मारहाण केली असल्याचा आरोप केला आहे.
कप्तान मलिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आपण मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली असल्याचे सोमय्या म्हंटले आहे. तर कामगारांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात आपण चुनाभट्टी पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदवणार असल्याचे सुद्धा सोमय्या म्हणाले.