Kirit Somaiya reaction on Yamini Yashwant Jadhav and Ravindra Waikar candidature: महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपा विरूद्ध तत्कालीन शिवसेना असा सामना रंगला होता. २०१९ ते जून २०२२ या कालावधीत भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंच्या तेव्हाच्या शिवसेनेतील काही नेतेमंडळींवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. जून २०२२ नंतर त्यातील बरेच नेते एकनाथ शिंदेंच्या सोबत भाजपासोबत महायुतीत आले. सोमय्या यांनी आरोप केलेले यशवंत जाधव यांची पत्नी यामिनी जाधव, रवींद्र वायकर, राहुल शेवाळे या तिघांनी मुंबईतून लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यावरून ठाकरे गटाने सोमय्या आणि भाजपावर टीका केली होती. त्याला आता सोमय्या यांनी उत्तर दिले आहे.
"पंतप्रधान मोदींसाठी आम्ही प्रत्येक मतदाराकडून मत मागणार आहोत. यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांचा प्रचार करणार का? असे प्रश्न तुम्ही लोक मला विचारत असता; पण हेच प्रश्न तुम्ही उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अनिल परब या लोकांना विचारण्याची हिंमत दाखवा. नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवणे, भारताला पहिल्या क्रमाकांची अर्थव्यवस्था बनविणे याला मी आयुष्यात कधीच समझोता म्हणणार नाही. ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. आपला देश आणि सर्व मतदार हे सध्या पंतप्रधान निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदाराकडून आम्ही मोदींसाठी आणि त्यांच्या कामांसाठी मत मागणार आहोत. नकली सेनेच्या नेत्याला तीन महिन्यासाठी पंतप्रधान व्हायचे असेल तर आम्ही समझोता करूच शकत नाही," अशी रोखठोक प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी टीव्हीनाइनशी बोलताना दिली.
"महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील साडे बारा कोटी जनता हेच म्हणताना दिसत आहे की मोदी है तो मुमकीन है. त्यामुळे महायुतीच्या सर्वच उमेदवारांसाठी आम्ही प्रचाराच्या रिंगणात उतरलो आहोत, आम्ही फिरतोय आणि फिरणार. अनिल परबांना सांगा की तुमचे मालक उद्धव ठाकरे यांनी सांगावे की ते आणि वायकर पार्टनर होते का? उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी नंदकिशोर चतुर्वेदींकडून आलेले हवालाचे २०० कोटी कुठे गेले? हे सांगा," असे आव्हान सोमय्या यांनी ठाकरे गटाला दिले.
अनिल परब काय म्हणाले होते?
"किरीट सोमय्या यांच्या म्हणण्याप्रमाणे रवींद्र वायकर हे भ्रष्टाचारी होते, पण शिंदेंच्या शिवसेनेचे त्यांनी पक्षात घेतले. यशवंत जाधव जशी चौकशी सुरु झाली तेव्हा शिंदे गटात पळाले. या एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचाराचे आरोप केलल्या लोकांना मंगळवारी लोकसभेची उमेदवारी दिली. यावरून असा प्रश्न पडतो की, महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला या भ्रष्ट्राचार मान्य होता का? राहुल शेवाळे, यामिनी जाधव, वायकर या सर्वांचे प्रचारप्रमुख म्हणून किरीट सोमय्या यांची नियुक्ती केली जाणार का? माझी अशी विनंती आहे की त्यांनाच यांचे स्टार प्रचारक करावे. कारण त्यांच्यामुळेच तुम्हाला हे उमेदवार मिळाले आहेत. लाखमोलाचे जे उमेदवार महायुतीला मिळाले आहेत, त्याचे श्रेय किरीट सोमय्या यांनाच जाते. मग किरीट सोमय्या यांनाच या उमेदवारांचा प्रचार करायला लावावा. सोमय्या यांनी हे उमेदवार कसे स्वच्छ आहेत, हे महाराष्ट्राला समजावून सांगावं अशी माझी भाजपा विनंती आहे," असा खोचक टोला परब यांनी भाजपा, सोमय्यांना लगावला होता.