सक्तवसुली संचालनालयाने (ED) मंगळवारी शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ८ तास चौकशी केली. वायकर हे जोगेश्वरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांच्या चौकशीने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. यावरुन, महाविकास आघाडीचे नेते ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप करत आहेत. दरम्यान, या कारवाईनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
"हिशोब तर द्यावाच लागेल," अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी यानंतर दिली. त्यांनी यासंदर्भात एक ट्वीटही केलं आहे. "उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर शिवसेना नेते रवींद्र वायकर यांची ईडी चौकशी सुरू झाली आहे. मोठ्या मोठ्या बिल्डर्सकडून, महापालिका कंत्राटदारांकडून जो किकबॅक मिळाला आहे, मग तो एफएसआय, कोणत्या कंपनीतील फ्रॉड या सर्वांची चौकशी व्हायलाच हवी," असंही ते म्हणाले.
वायकर यांची चौकशी किरीट सोमय्या यांनी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपानंतर वायकर यांची चौकशी केल्याचं समजतंय. वायकर यांनी ईडीकडे काही कागदपत्रेही सादर केली आहेत. तसंच गरज पडल्यास त्यांना पुन्हा चौकशीला बोलावण्यात येऊ शकतं, असेही ईडीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, वायकर यांना नेमकं कोणत्या प्रकरणातील चौकशीसाठी बोलविण्यात आलं होतं, हे अद्याप सांगण्यात आलेलं नाही. तर, वायकर यांनीही ईडीच्या चौकशीबाबत काहीही बोलण्यास नकार दिला.