रत्नागिरी-
दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीवरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. "दापोली पोलीस स्टेशनला आग. पोलीस ठाण्यात अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट्सची कागदपत्रे/पुरावे होते. याची काळजी वाटते", असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं आहे. सोमय्यांच्या या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीबाबत किरीट सोमय्यांनी पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.
दापोली पोलीस ठाण्याला शनिवारी आग लागली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक पोलीस ठाण्यात आग लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या आगीत काही कागदपत्रे आणि रेकॉर्ड्स जळाल्याची माहिती समोर आली आहे. याच मुद्द्यावरुन किरीट सोमय्या यांनी ट्विट करत अनिल परब यांच्याशी निगडीत अनधिकृत रिसॉर्ट्स संदर्भातील आरोपांवरुन निशाण साधला आहे.
किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत पत्र लिहीलं आहे. "दापोली पोलीस ठाण्यात येथे काही दिवसांपूर्वी आग लागली. या आगीत मी दिलेली तक्रार, अनधिकृत साई रिसॉर्टआणि सी कौंच रिसॉर्ट, अनिल परब/सदानंद कदम या संबंधीचे केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केलेली कार्यवाही, पोलिसांसोबत केलेला पत्रव्यवहार सुरक्षित आहे का? या संबंधीचा मुख्य तक्रारदार मी असल्यामुळे मला याची अधिक चिंता आहे", असं सोमय्या यांनी दापोली पोलीस निरीक्षकांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे आगीत नेमकी कोणती कादगपत्र जळून खाक झाली याची माहिती मिळू शकलेली नाही.