भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात गेल्या काही काळापासून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यात सोमय्या यांनी जंबो कोविड सेंटर घोटाळ्यात मध्ये राऊतांचा सहभाग असल्याचे आरोप केल्याने आणि ईडी कारवाईवरून राज्यातील राजकीय वातावरण पेटले आहे. राऊतांनी सोमय्या यांना दलाल आणि अन्य शब्द संबोधत सोमय्या पिता पूत्र जेलमध्ये जाणार असल्याचे भाकित केले आहे. आता सोमय्यांनी आरोप केलेल्या जमिन व्यवहारातील मालक समोर आला आहे.
संजय राऊतांनी अलिबाग येथे जमीन मालकावर दबाव टाकून जमीन घेतल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर आता हा जमिन मालक समोर आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांनी अलिबाग येथे जमीन मालकाकडून दबाव टाकून जमीन घेतली असल्याचा आरोप केला होता. मात्र या आरोपावर लोकमतने थेट मूळ मालकाशी संवाद साधला. होय मीच संजय राऊत याना जमीन विकली मात्र आमच्यावर कोणताही दबाव नव्हता, खेळीमेळीच्या वातावरणात हा व्यवहार झाला आहे. आमचे घरगुती संबंध देखील चांगले असल्याने हा संपूर्ण व्यवहार झाला, असे हे मुळ जमिन मालक चंद्रकांत भिडे म्हणाले. 1997 साली 60 ते 70 हजारात 1 एकर जमीन विकली आणि हा व्यवहार पूर्ण पणे पारदर्शक असल्याचे देखील भिडे यांनी सांगितले.
किरीट सोमय्या यांनी कोर्लई गावामध्ये रश्मी ठाकरे यांचे १९ बंगले बेकायदेशीर पणे बांधल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात तिथे एकही पक्के घर बांधलेले नाही, हे समोर आले आहे. तिथे काही वर्षांपूर्वी कच्च्या झोपड्या बांधल्या होत्या. त्यांची नोंद तेथील ग्रा. पंचायतकडे होती. संशयित रित्या मृत्यू झालेले आर्किटेक्ट अन्वय नाईक यांना तिथे रिसॉर्ट बांधायचे होते. परंतू तिथे निर्बंध असल्याने ती जमिन ठाकरेंनी विकत घेतली होती. ग्राम पंचायतने ठाकरेंना कर भरण्यास सांगितले होते, त्यानुसार ठाकरेंनी कर भरला होता. आता तिथे काहीच नसल्याने ग्रा. पंचायतने करातून ही प्रॉपर्टी वगळली आहे.