कोर्लई: अलिबागच्या कोर्लई गावातील रश्मी उद्धव ठाकरेंच्या मालकीचे १९ बंगले दाखवा, असं आव्हान शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांना दिलं होतं. सोमय्यांनी बंगले दाखवल्यास मी राजकारण सोडेन. पण त्यांना बंगले दाखवता आले नाहीत, तर मी त्यांना चपलेनं मारेन, असा स्पष्ट इशाराच राऊत यांनी दिला होता. यानंतर आता कोर्लई गावचे सरपंच प्रशांत मिसाळ यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे.
कोर्लईमध्ये अन्वय नाईक यांच्या मालकीची जमीन होती. २००९ मध्ये त्यांनी या ठिकाणी काही कच्ची घरं उभारली. पोफळी, बांबूंच्या मदतीनं जोत्यावर ही घरं बांधली गेली होती. जवळपास ९ एकर जागेवर रिसॉर्ट बांधण्याचा नाईक यांचा मानस होता. मात्र सीआरझेडच्या नियमांमुळे त्यांना रिसॉर्ट उभारता आला नाही. त्यानंतर त्यांनी ही जमीन रश्मी उद्धव ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांना विकली. २०१४ मध्ये हा व्यवहार झाला, असं प्रशांत मिसाळ यांनी सांगितलं
अन्वय नाईक यांनी २०१४ पर्यंत घरपट्टी भरली. रिसॉर्ट बांधण्यास परवानगी नसल्यानं त्यांनी १८ कच्ची घरंदेखील जमीनदोस्त केली. तिथे झाडं लावली. ती आजही तिथे आहेत. ठाकरे आणि वायकरांनी जमीन खरेदी केल्यानंतर घरपट्टी थकली होती. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र लिहिलं. यानंतर त्यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून घरपट्टी भरली. त्याची नोंद ग्रामपंचायतीकडे आहे, असं मिसाळ म्हणाले.
ठाकरे आणि वायकर यांच्या नावे असलेल्या जमिनीवर सध्या एकही घर नाही. तिथे केवळ झाडं आहेत, असं मिसाळ यांनी सांगितलं. घरंच अस्तित्वात नसताना घरपट्टी कशी काय भरली गेली, असा सवाल मिसाळ यांना विचारण्यात आला. त्यावर ठाकरे-वायकरांच्या मालकीच्या जमिनीला कंपाऊंड घालण्यात आलं आहे. त्यामुळे आम्हाला आत जाता आलं नाही. २०२१ मध्ये आम्ही पाहणी केली असता तिथे घरंच दिसली नाहीत. त्यामुळे पंचनामा करून आम्ही २६ मार्च २०२१ रोजी त्या घरांची नोंद रद्द केली. त्याआधी ही घरं केवळ कागदावर अस्तित्वात होती, असं मिसाळ म्हणाले.