आयएनएस विक्रांतसाठी पैसे गोळा केल्याच्या आरोपांमुळे भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या अडचणीत आले आहेत. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेला अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने किरीट सोमय्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. तर नील सोमय्यांच्या जामिन अर्जावरील निकाल उद्यासाठी राखून ठेवण्यात आला आहे. सोमय्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात अपिल करणार असल्याचे म्हटले आहे.
सोमय्यांचे वकील आणि सरकारी वकिलांनी या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केला. या प्रकरणाचा निकाल न्यायालयानं राखून ठेवला होता. तो सायंकाळी देण्यात आला. विक्रांत निधी संकलन प्रकरण २०१३ मधलं आहे. त्या प्रकरणी आता एफआयआर दाखल झाला आहे. यासाठी दबाव आणण्यात आला होता, असा युक्तिवाद सोमय्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. शिवसेना आणि इतर पक्षांनीदेखील विक्रांतसाठी निधी गोळा केला होता. सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी जमा केलेला निधी आपल्या पक्षाकडे सुपूर्द केला, असंही सोमय्यांचे वकील पुढे म्हणाले.
सोमय्या यांच्यावर सूडबुद्धीनं कारवाई होत असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला. बाप बेटे तुरुंगात जातील, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यानंतर हे प्रकरण बाहेर काढण्यात आलं. त्यासाठी बराच राजकीय दबाव होता, असाही दावा सोमय्यांच्या वकिलांकडून करण्यात आला.
भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आयएनएस विक्रांत ही युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी किरीट व निल सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी बजावलेल्या समन्सला ते शनिवारी गैरहजर राहिले होते. दाखल गुन्ह्यातील रक्कम जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय?रेल्वे स्थानकाबाहेर दोन्ही आरोपी (सोमय्या पितापुत्र) सेव्ह विक्रांत असा उल्लेख असलेले टी-शर्ट घालून पैसा गोळा करत असल्याचे फोटो उपलब्ध आहे. विक्रांतसाठी पैसे जमा करणाऱ्यांना त्यांच्याकडून कोणतीही पावती दिली जात नव्हती. त्यांनी साडे अकरा हजार गोळा केल्याचं सांगितलं. ही रक्कम लहान असली तरी अपहार हा अपहार असतो. ती रक्कम राजभवनात जमा झालेली नसल्याचं खुद्द राजभवनाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे ती रक्कम गेली कुठे याचं उत्तर मिळायला हवं. त्यासाठी सोमय्या पिता पुत्रांना कोठडी दिली जावी, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केली.