पुणे : सोशल मीडियाच्या हव्यासापायी जग मातीत गेल्याची चर्चा असताना दुसरीकडे पुण्याजवळच्या एका गावाने मात्र याच सोशल मीडियाच्या आधारावर गावाच्या समस्या सोडवण्याचा विडा उचलला आहे. त्यांचे कॅम्पेन बघून इतर गावंही या गावाकडून मार्गदर्शन मागत आहे. गेले दोन दिवस खड्ड्यांमुळे चर्चेत आलेल्या किरकटवाडीचे ग्रामस्थ अनेक महिन्यांपासून ट्विटरवर मोहीम राबवत आहेत. पण त्यांचा हा प्रवास तितकासा सोपा नाही.
इतरांप्रमाणे हे गावसुद्धा सुरुवातीला फेसबुक आणि व्हॉटस ऍप अशा दोनच सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे होते. मात्र इथल्या रस्त्याची समस्या वाढल्यावर नागरिकांनी एकत्र येऊन सरकारला, प्रशासनाला निवेदनं दिली, लोकप्रतिनिधींकडे दाद मागितली. मात्र त्याचा काहीही उपयोग होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी थेट ट्विटरवरून मोहीम उभारली. आता तर ग्रामस्थांनी विशेष फोरम स्थापन करून गावाच्या समस्या सोडवण्याचा विडा उचलला आहे. गावातून एक-दोन नव्हे काही हजारहून अधिक नागरिकांनी ट्विटर अकाउंट उघडले. अगदी नोकरदारापासून ते सलून चालवणाऱ्यापर्यंत गावातील अनेक जण आत्मविश्वासाने ट्विट वापरत आहे.
अगदीच प्रारंभी अपवाद वगळता गावातल्या कोणालाही ट्विटर कळत नव्हते. फक्त पोस्ट रिट्विट करण्याचे काम केले जायचे.पण हळूहळू सर्वांना ट्विटर समजायला लागले.आज ते गावासंबंधी पोस्ट टाकल्यावर त्यावर कमेंट करतात, योग्य व्यक्तीला टॅगही करतात. त्यांच्या मोहिमेला काहीसे यशही आले. या नागरिकांनी मागणी केलेला एक रस्ता दुरुस्त झाला आहे. . त्यांना मुख्य रस्ता नादुरुस्त असून त्यासाठी त्यांची मोहीम सुरु आहे.मात्र त्यांची मोहीम बघून इतर गावाचे ग्रामस्थ त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही आमच्या समस्या सोडवण्यासाठी काय करू शकतो याची माहिती विचारत आहेत.
याबाबत किरकटवाडी ग्रामस्थांशी चर्चा केली असता त्यांनी सुरुवातीला ट्विटर ऑपरेटिंग जमत नसल्याचे सांगितले. मात्र आम्ही रस्त्याच्या समस्येने त्रासलो होतो. त्यामुळे अधिकाधिक लोकांना मोहिमेत सहभागी करून घेणे महत्वाचे होते. त्यासाठी सोसायट्यांमध्ये जाऊन आम्ही लोकांना ट्विटरचे डेमो दिले आणि मोहिमेला अधिक बळ मिळाले.किरकटवाडीचा रस्ता होईलही मात्र त्यांनी सुरु केलेला ट्रेंड ग्रामीण भागात कायमस्वरूपी रुजण्याची चिन्हे दिसत आहेत.