मुंबई : माध्यमांच्या स्फोटामुळे घरबसल्या करमणूक होते. पण त्यामुळे सर्व जिवंत कला प्रकारांवर आक्रमण झाल्याने नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसट तर होणार नाही ना, याची भीती वाटते. नाट्य व्यवसायावरील आक्रमणे रोखायची असतील; तर नाट्य परिषद, राज्य सरकार, कलाकार, तंत्रज्ञ, निर्मात्यांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांनी बुधवारी केले.ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते नाट्यसंमेलनाचे उद््घाटन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे होते. स्वागताध्यक्ष विनोद तावडे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. मावळते अध्यक्ष जयंत सावरकर यांच्या हस्ते शिलेदार यांनी सूत्रे स्वीकारली.नाट्यव्यवसाय पूर्वी परस्परांच्या सहकार्याने चालत होता. अन्य माध्यमांबरोबर नाटकात काम करणाऱ्या सेलिब्रिटी कलाकारांमुळे निर्माते अडचणीत आले. वेगवेगळ््या माध्यमांचे या व्यवसायावर आक्रमण सुरू आहे. त्यातून प्रेक्षकांना भुर्दंड बसेल. बालरंगभूमी सशक्त करायची असेल, तर शालेय शिक्षणातच नाटक या विषयाचा समावेश करायला हवा, असे शिलेदार म्हणाल्या.नाटक मोठे होण्यासाठी बालरंगभूमीचा पाया मजबूत करण्याची गरज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. आजच्या बालरंगभूमीवर उद्याची प्रायोगिक रंगभूमी अवलंबून असते, तर उद्याच्या प्रायोगिक रंगभूमीवर भविष्याची व्यावसायिक रंगभूमी अवलंबून असल्याचेही त्यांनी सांगितले.मराठी नाटकात भव्यता यायला हवी, या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याला पवार यांनी दुजोरा दिला. मराठी नाट्यसृष्टीत नवनवीन प्रयोग करण्याची गरज आहे. नवीन कलाकार आणि थिएटरचा दर्जा यांसह कलाकारांच्या आर्थिक परिस्थितीकडेही नाट्य परिषदेने लक्ष केंद्रीत करायला हवे. त्यासाठी शासकीय किंवा सामाजिक संस्थांच्या मदतीची गरज नाही. मराठी रसिक त्यासाठी सक्षम आहे. मात्र त्यासाठी नाटकाचे आशय आणि विषय यामधील कमतरता दूर करण्याची आवश्यकता आहे. नाटकांना गतीमानता देण्यासाठी रसिक पैशांकडे बघणार नाहीत, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.नाटक हा मराठी माणसांच्या जिव्हाळ््याचा विषय आहे. मात्र नाट्यक्षेत्रात काही चुकीच्या गोष्टी शिरल्या आहेत, त्या बाजूला सारून नाटक मोठे व्हायला हवे, अशी सूचना राज ठाकरे यांनी नाट्य परिषदेला केली. मराठी माणसाला चित्रपट किंवा टीव्ही मालिकांहून अधिक वेड नाटकाचे आहे. मात्र तरीही नाटके चालत नाहीत. नाट्यक्षेत्रात थिएटर्सच्या तारखा विकल्या जात असल्याचे समजले. नाटक विकण्याऐवजी तारखा विकून पोट भरण्याइतके दुर्दैव नाही. हे रोखण्यासाठी नाटकावर प्रेम असलेल्यांनी आणि कलावंतांनी नाटक अधिक चांगले कसे होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. भव्यता आणि संहिता एकत्र आल्या, तरच मराठी प्रेक्षक नाटकाकडे वळतील. त्यासाठी तिकीटाचे दर वाढवावे लागले, तरी चालेल असा सल्लाही त्यांनी दिला. थिएटर्समधील बाथरूमपेक्षा नाटकाचा विषय अधिक महत्त्वाचा आहे, हे आवर्जून सांगताना ठाकरे यांनी खास शैलीत आंब्याच्या विषयावरून संभाजी भिडेंचाही उल्लेख केला.
नाटकवेडा महाराष्ट्र ही ओळख पुसण्याची भीती, नाट्यसंमेलनाध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची भावना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 7:00 AM