शिंदे गटातील दोन ज्येष्ठ नेते असलेल्या रामदास कदम आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्यात रंगलेल्या वादामुळे शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाली होती. गजानन कीर्तिकर यांनी प्रेसनोटमधून गद्दार असा उल्लेख करत आरोप केल्यानंतर संतप्त झालेल्या रामदास कदम यांनी गजानन कीर्तिकर यांच्यावर बेछूट आरोप केले होते. दरम्यान, या वादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांशी संवाद साधला होता. आता मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा वाद १०० टक्के मिटला आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले आहे. आता भविष्यात आपापसात वाद झाले तर ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असेही रामदास कदम म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर रामदास कदम म्हणाले की, गजानन कीर्तिकर आणि रामदास कदम यांच्यामध्ये दिवाळीत फटाके फुटत होते. दिवाळीमध्ये शिमगादेखील लोकांना पाहायला मिळाला. तो भविष्यात दोघांकडून होता कामा नये. कीर्तिकर काल मुख्यमंत्र्यांना भेटून आले. त्यांची भूमिका सांगितली. मी मुख्यमंत्र्याना सांगितलं की, भविष्यात आपापसात वाद झाले तर ते मुख्य नेत्यांकडे बोललं पाहिजे. प्रेसनोट काढून माध्यमांकडे जाऊ नये, अशी सूचना कीर्तिकर यांना द्यावी, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांकडे केली. सर्वजण आपल्यावर विश्वास ठेऊन आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटापेक्षा कितीतरी जास्त यश आपल्याला मिळालं आहे. अशा परिस्थितीत दोन नेतेच आपापसात भांडताहेत हे चित्र योग्य नाही. याची जाणीव मलाही आहे, असे रामदास कदम यांनी सांगितले.
यावेळी वैयक्तिक आरोप करणं कितपत योग्य आहे असं विचारलं असता रामदास कदम म्हणाले की, मी कीर्तिकर यांच्याबाबत जी विधानं केली ती अगदी योग्य होती, असं मला वाटतं. कारण कीर्तिकर यांनी रामदास कदम यांच्यावर गद्दारीचा शिक्का आहे. असे बोलणं योग्य आहे का? पक्षासाठी मी कफन बांधून लढलोय. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडे पाहिलं जातं. कुठलीही शाहनिशा न करता मला राजकारणातून संपवण्याकरता एखादी प्रेसनोट काढणं हे कितपण योग्य आहे. असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला. या प्रेसनोटमध्ये गजानन कीर्तिकर यांनी लिहिलंय की ३३ वर्षांपूर्वी मी त्यांना कांदिवलीमध्ये पाडण्याचा प्रयत्न केला होता. पण कांदिवलीला शाखाप्रमुख म्हणून मी जे काम केलं होतं, त्या जोरावर गजानन कीर्तिकर निवडून आले होते. आता एवढ्या वर्षांनंतर कीर्तिकरांना मी त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवण झाली का, आपण एक बोट दाखवतो तेव्हा चार बोटं आपल्याकडे असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे असेही कदम यांनी यावेळी सांगितले. आता भविष्यात असं काही बोलायचं नाही. जर काही प्रश्न असतील तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मांडायचे असे निश्चित झाले आहे, असेही रामदास कदम म्हणाले.
आता मी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून गजानन कीर्तिकर यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आमच्यातील वाद संपला आहे. १०० टक्के मिटला आहे. कुठेही मनात शंका राहिलेली नाही. उत्तर-पश्चिम मतदारसंघामध्ये गजानन कीर्तिकर खासदार आहेत. तेच निवडणूक लढवतील. ते निवडणूक लढवत असतील तर मला काहीही अचडण नाही. मला पक्षामध्ये मतभेद ठेवायचे नाहीत. मी मुख्यमंत्र्यांना शब्द दिला आहे, त्यानुसार मी हा वाद थांबवतोय, असेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.