ऑनलाइन लोकमतजि.बुलडाणा, दि. १९ : शेतकऱ्यांना घरबसल्या एसएमएसव्दारे कृषी विषयक सल्ला देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला असून किसान एसएमएस सेवा सुरू केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांची आतापर्यंत एसएमएस सेवेमध्ये नोंदणी झाली आहे.
शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे कृषी विषयक सल्ला हा कार्यक्रम राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. राज्यस्तरावरील १३८ लाख शेतकऱ्यांपैकी किमान ५० लाख शेतकऱ्यांना किसान एसएमएस सेवेमध्ये आणण्याचा शासनाचा मानस आहे. किसान एसएमएस सेवेव्दारे शेतकऱ्यांना घरबसल्या कृषी विषयक विविध योजनांची माहिती, हवामानाचा अंदाज, नवनवीन तंत्रज्ञान, खरीप, रब्बी, उन्हाळी हंगामात करावयाची कामे, फळबाग, भाजीपाला वर्गीय पिकनिहाय माहिती देण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग त्या भागातील शेतीची परिस्थिती आॅनलाईन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडे (आत्मा) पाठविली आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना एसएमएसव्दारे माहिती पाठविली जाते.
या माहितीच्या आधारे त्या भागात पिकावरील रोगराई, किडविषयक सल्ला, पेरणीची वेळ, मशागतीची योग्य वेळ याविषयी सविस्तर माहिती एसएमएसव्दारे पाठविली जाते. तालुका कृषी कार्यालयातील प्रती कृषी सहाय्यक शेतकरी मित्र यांना किमान ५०० शेतकऱ्यांची माहिती नोंदणी करण्याचे लक्षांक दिले आहे. शेतकऱ्यांच्या सर्वात्रिक विकासासाठी शासन कृषी विभागाकडून विविध उपाययोजना राबवित असताना आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीचा शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे.शेतकऱ्यांना मोफत कृषी विषयक सल्ला तसेच पीक हवामानाचा अंदाज याविषयी माहिती देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या किसान एसएमएस सेवेचा शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. सर्व शेतकऱ्यांना यामध्ये सामावून घेण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.- नरेंद्र नाईक, प्रकल्प संचालक (आत्मा)बुलडाणा.