- जितेंद्र कालेकर, ठाणे
सुमारे अडीच हजार कोटींच्या इफे ड्रीन साठा तसेच एक टन तीनशे किलो इफे ड्रीनच्या तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांना पाहिजे असलेल्या विकी गोस्वामी, ममता कुलकर्णीसह किशोर राठोडही हुलकावणी देत असल्यामुळे त्याला अटक करण्याचेही आव्हान पोलिसांसमोर आहे. जुलैमध्ये त्याचे वडील तथा गुजरातचे माजी आमदार भावसिंग राठोड यांच्यासह चार जणांची गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने चौकशी केली. त्यानंतर पुन्हा आणखी एका पथकाने गुजरातमध्ये त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो मिळत नसल्यामुळे त्याच्या नातेवाईक आणि मित्रांची पुन्हा चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एव्हॉनमधील १३०० किलो इफे ड्रीन केनियात पाठविण्यासाठी नरेंद्र कांचा मार्फत किशोरने गुजरातला पाठविले होते. गुजरात पोलिसांनी त्याचवेळी नेमका अहमदाबाद येथे इफे ड्रीनचा हा साठा पकडला. त्यामुळे ठाण्याप्रमाणे गुजरात पोलिसांच्याही तो रडारवर आहे. त्याच्याशी गेल्या काही महिन्यांमध्ये काहीच संपर्क नसल्याचे भावसिंग राठोड यांनी सांगितले. असे असले तरी राठोड कुटूंबियांची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. तो परदेशात असल्याची खातरजमा झाली नसल्याने भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर किशोरच्या शोधासाठी ‘लूक आऊट’ नोटीस बजावल्याचेही एका वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.दरम्यान, नवी मुंबईतील खांदेश्वर भागात राहणाऱ्या सुशिलकुमार असिकन्नन यानेही आपल्या कुटूंबियांशी संपर्क साधला नसल्याचे त्याच्या पत्नीने ठाणे पोलिसांना सांगितले. त्याने अत्यंत चाणाक्षपणे ठाणे न्यायालयात आपल्या वकिलांमार्फत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतरही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोही हाती लागलेला नाही.त्यामुळे विकी, ममता तसेच डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे साथीदार हे परदेशातून तर किशोर आणि असिकन्नन हे भारतातूनच ठाणे, गुजरात तसेच केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पोलिसांना चकवा देत आहेत. या सातपैकी कोणाचाही थांगपत्ता लागत नसल्याने त्यांचा माग घेण्याचे पोलिसांना आव्हान असल्याचे एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.सात जणांचा अद्याप शोध सुरूच- विकी, ममता, किशोर, सुशीलकुमार असिकन्नन, डॉ. अब्दुल्ला आणि त्याचे दोन साथीदार अशा सात फरारी आरोपींचा ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध सुरु आहे. किशोरच्या शोधासाठी पोलिसांचे पथक दोन वेळा गुजरातला गेले होते. त्यानंतर किशोरचे वडील माजी आमदार भावसिग आणि कुटूंबियांची ठाण्यात चौकशी केली होती.