Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला ऐतिहासिक खिंडार पडले. टोकाला गेलेल्या संघर्षानंतर आता शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे. यातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. या भेटीनंतर दीपाली सय्यद यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद नाराज असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच त्या शिंदे गटात सामील होती, असा दावा केला जात आहे. मात्र, दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती, असे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. मी शिंदे गटात जाणार की नाही ते लवकरच समजेल. मात्र लोकांची तशी इच्छा आहे, असे सांगताना, उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यभर दौरा करायला हवा होता. त्यांना भेटण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागायची. त्यांच्या बाजूची चार माणसे आमचा संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नव्हते, असे दीपाली सय्यद यांनी म्हटले होते. याला किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
गांभीर्याने घेण्याची गरज नाही
दीपाली सय्यद यांनी कोणाला भेटावे का भेटावे? हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये एक स्पर्धा लागलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयी जेवढे चुकीचे मत व्यक्त कराल तेवढे मोठे पद मिळेल, असा प्रकार सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली की इप्सित साध्य होते. त्यामुळे दीपाली सय्यद असो किंवा अन्य कोणी, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. माझ्या शुभेच्छा असतील. त्यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती, असा दावा करत, माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन. काही काम करायचे असेल तर आता आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो. आम्ही ते काम मुख्यमंत्र्यांना सांगतो. त्याची पुढे अंमलबजावणीही होते. ते खूप महत्त्वाचे आहे, असे दीपाली सय्यद यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"