माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळाप्रकरणी दादर पोलिसांनी शुक्रवारी चौकशी केली. तसेच शनिवारी पुन्हा चौकशीला बोलवण्यात आले. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी जूनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पालिका अधिकाऱ्याच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यामध्ये चार जणांना अटकही करण्यात आली. यामध्ये पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. याच दरम्यान आता किशोरी पेडणेकरांच्या सासूबाईंचं निधन झालं आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर (Kishori Pednekar) यांचं निधन झालं आहे. यानंतर आता पेडणेकरांनी सासूबाईंच्या निधनाचं खापर किरीट सोमय्यांवर फो़डलं आहे. “माझ्या कुटुंबातील एकाचा बळी घेतला” असा गंभीर आरोप केला आहे. तसेच सोमय्यांनी केलेल्या आरोपांमुळे सासूबाईंनी धसका घेतल्याचं म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्याचं देखील म्हटलं आहे.
"कायद्याचं उत्तर कायद्याने देणार"
“किरीट सोमय्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत. या बातम्या पाहून सासूबाईंच्या मनावर परिणाम होत होता. त्यांचं वय नक्कीच होतं. पण बातम्या त्य़ा रोज पाहायच्या... सासरे जाऊन तीस वर्ष झाली. बातम्या ऐकून त्या घाबरल्या, त्यांना त्रास सुरू झाला. याचं भांडवल करत नाही पण फॅक्ट सांगत आहे. किती बोलायचं ते बोला मी त्यांना उत्तर देणार नाही, कायद्याचं उत्तर कायद्याने देणार.”
"मी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार"
“माझ्या सासूबाई मला शुभांगी म्हणायच्या... सासरची मंडळी मला किशोरी नाही तर शुभांगी म्हणतात. सासूबाईंना माझी काळजी वाटायची. हा लढा मी देणार आहे. मुख्यमंत्री मुळचे शिवसैनिक आहेत ते दबावाला बळी पडणार नाहीत. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे” असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"