ऑनलाइन लोकमत,गडचिरोली, दि. 24 - येथील शासकीय आदिवासी मुला-मुलींच्या वसतिगृहातून विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने त्यांचे हाल होत असून, आज शेकडो विद्यार्थ्यांना चक्क वसतिगृहासमोरील रस्त्यावरच स्वयंपाक करावा लागला. गडचिरोली येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत गडचिरोली शहरात वसतिगृहे चालविली जातात. या वसतिगृहांमध्ये वास्तव्य करुन गोरगरीब आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकदा वसतिगृहात प्रवेश मिळाला की दुसऱ्या वर्षी महाविद्यालयाची बोनाफाईड सर्टिफिकेट व गुणपत्रिकेची सत्यप्रत जोडून वसतिगृहात प्रवेश देण्याची प्रक्रिया आजतागायत सुरु होती. त्यानुसार यंदा महाविद्यालये १५ जूनपासून सुरु झाल्यानंतर अनेक विद्यार्थी वसतिगृहात राहायला आले. त्यांना दररोज भोजनही मिळत होते. २७ जूनपासून २१ जुलैपासून सर्व सुरळीत होते. परंतु नंतर मात्र अचानक प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूचनेवरून लांजेडा येथील वसतिगृहाच्या अधीक्षिकेने व काही कर्मचार्यांनी शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास १४ मुलींना वसतिगृहाबाहेर काढले. तसेच पोटेगाव मार्गावरील मुलांच्या वसतिगृहाबाहेर एक नोटीस लावण्यात आला असून, त्यात नवीन शैक्षणिक सत्रातील प्रवेश यादी मंजूर नसून, भोजन ठेवण्याचे दरही मंजूर झाले नाहीत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत भोजन मिळणार नाही, अशी सूचना लिहिण्यात आली आहे. त्यामुळे तेथील सुमारे दीडशे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. काल या सर्व विद्यार्थ्यांनी आ.डॉ.देवराव होळी यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. त्यानंतर आ.डॉ.होळी यांनी विद्यार्थ्यांना अन्नधान्य, भांडी व गॅस उपलब्ध करुन दिला. परंतु वसतिगृहात भोजन करण्याची मनाई करण्यात आल्याने आज शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच स्वयंपाक केला. वसतिगृहात वास्तव्य करु देण्यास प्रकल्प कार्यालयाने नकार दिल्याने अनेक विद्यार्थी गावी गेले असून, त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे
आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर शिजवला स्वयंपाक
By admin | Published: July 24, 2016 5:23 PM