मुंबई: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत याही आरोपी असल्याचे सांगितले जात आहे. (Sanjay Raut Property)
मिळालेल्या माहितीनुसार, बँकेत संजय राऊतांच्या नावे बऱ्याच एफडी आहेत. शिवाय मुंबईसह अलिबागमध्येही त्यांच्या आणि पत्नीच्या नावे भूखंड, फ्लॅट असल्याची नोंद आहे. संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी नामनिर्देशन अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रावर आपली मालमत्ता, संपत्ती जाहीर केली होती. तेव्हा आपल्याकडे १ लाख ५५ हजार ७७२ रुपये रोकड असल्याचे संजय राऊत यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेय. बँक खात्यात १ कोटी ९३ लाख ५५ हजार ८०९ रुपये असल्याचे राऊतांनी सांगितले होते.
३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी
प्रतिज्ञापत्रानुसार, संजय राऊत यांच्याकडे ३ कोटी ३८ लाख ७७ हजार ६६६ रूपयांच्या ठेवी आहेत. २०२०-२१ या वर्षांत २७ लाख ९९ हजार १६९ रूपये कमावले. संजय राऊत यांच्याकडे अलिबागमध्ये जमिनीचे तीन तुकडे त्यांच्या नावावर आहेत. तर त्यांच्या पत्नीच्या नावे पालघरमध्ये ०.७३ एकरची जाग आहे. ही जागा २०१४ मध्ये खरेदी करण्यात आली आहे. सध्या या जागेची किंमत ९ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे दादरमध्ये एक घर आहे. भांडुप आणि आरे मिल्क कॉलनीमध्ये एक एक घर आहे.
वर्षा राऊत यांच्या नावे किती संपत्ती आहे?
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांच्याकडे ७२९.३० ग्रॅम सोनं दागिन्यांच्या स्वरूपात आहे. त्याची किंमत ३९ लाख ५९ हजार ५०० रूपये आहे. तर १८२० ग्रॅम चांदी आहे त्याची किंमत १ लाख ३० हजार रूपये आहे. त्यांनी एक वाहन घेतलं आहे जे २००४ मध्ये घेतले आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत वर्षा राऊत यांची कमाई २१ लाख ५८ हजार ९७० इतकी होती. दादरमधे वर्षा राऊत यांच्या नावेही एक घर आहे. या घरांची सध्याची किंमत ६ कोटी ६७ लाख रूपये आहे. संजय राऊत यांच्या नावे व्यावसायिक प्रॉपर्टीही आहे. तसंच त्यांच्या पत्नीच्या नावेही मुंबईत तीन प्रॉपर्टी आहेत. या सगळ्याची किंमत ५ कोटी ५ लाखांच्या घरात आहे.
दरम्यान, ईडीने राऊतांच्या घराची झाडाझडती घेताना ११ लाख ५० हजार रुपयांची रोकड जप्त केली. त्याआधी ए्प्रिलमध्ये ईडीने राऊत यांची ११.५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती. संजय राऊत यांचा दादरमधील फ्लॅट ईडीने सील केला होता.