यदु जोशी, मुंबईराष्ट्रीय समाज पक्षाचे आ. महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत या दोघांनाच मंत्रिपदे द्यायची तयारी भारतीय जनता पार्टीने दर्शविली आहे. खा.रामदास आठवले स्वत: मंत्री होणार असतील, तरच संधी दिली जाणार असून, शिवसंग्रामचे आ.विनायक मेटे यांना तूर्त मंत्रिपद दिले जाणार नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारी रिपाइंचे खा. आठवले, ‘स्वाभिमानी’चे खा. राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे आ. जानकर आणि शिवसंग्रामचे आ. मेटे यांच्यासोबत बैठक घेतली. मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराबाबत सर्वांची मते जाणून घेण्यात आली.त्यानंतर रात्री भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष दानवे, सहकार मंत्री पाटील, सहप्रभारी खा.राकेश सिंग, व्ही. सतीश आदी उपस्थित होते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तारात भाजपातून कोणाला संधी द्यायची या बाबत चर्चा झाली. या शिवाय, मित्रपक्षांच्या नेत्यांपैकी जानकर व खोत यांना मंत्रिपद द्यावे. आठवले स्वत: मंत्री होणार असतील तरच त्यांच्या पक्षाला संधी द्यावी, अशी भूमिका समोर आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. जानकर हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. मात्र, स्वाभिमानीचे खोत हे दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत. पुढील महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर सदस्य पाठविण्यासाठी निवडणूक आहे. त्यात खोत यांना निवडून आणणे शक्य नाही. त्यामुळे जुलै २०१६ मध्ये विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर सदस्य पाठविताना खोत यांना संधी दिली जाईल, असे मानले जात आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री फौजिया खान यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला तरी त्या मंत्री राहिल्या होत्या. तोच पॅटर्न खोत यांच्या बाबत राबविला जाऊ शकतो. आ. मेटे यांना अरबी समुद्रात उभारण्यात यावयाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीचे अध्यक्षपद आधीच देण्यात आले आहे. ते त्यांच्याकडे कायम ठेवावे आणि त्यांना मंत्रिपद देऊ नये, असा भाजपामध्ये सूर आहे. मात्र, मेटे यांना मंत्रिपदच हवे आहे. ते म्हणाले, मंत्रिपदाचे आश्वासन भाजपाने आम्हाला विधानसभा निवडणुकीपूर्वीच दिले होते. ते आतातरी पूर्ण करावे, अशी आमची भूमिका आहे. बैठकीत विस्ताराबाबत चर्चा झाली. कोणत्याही घटक पक्षाने त्यांना अमुकच मंत्रिपद हवे, असा आग्रह धरलेला नाही. मात्र विस्तारात मित्रपक्षांना स्थान दिले जाईल. - रावसाहेब दानवे (प्रदेशाध्यक्ष, भाजपा)वर्षभरातील सरकारच्या कामगिरीबाबत आम्ही असमाधान कधीही व्यक्त केले नव्हते. सरकारच्या धोरणांबाबत आजच्या बैठकीत मित्रपक्षांनी भूमिका मांडली. मंत्रिमंडळात सामावून घेण्याबाबत भाजपाने दिलेले आश्वासन पाळावे.- खा. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)केंद्रात आणि राज्यात मंत्रिपद मिळाले पाहिजे, ही आमची मागणी कायम आहे. मला स्वत:ला राज्यात यायचे नाही; पण आमच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिले पाहिजे. आपली पत्नी सीमा आठवले यांना मंत्रिपद देण्याचा प्रश्नच येत नाही. घरात सत्ता ठेवावी या विचारांचा मी नाही. - खा. रामदास आठवले (रिपाइं)
जानकर, खोत यांना मंत्रिपद!
By admin | Published: November 24, 2015 3:09 AM