मुंबई : स्व. यशवंतराव चव्हाण आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पाहिलेले मराठी विश्वकोशाच्या संहिता खंडांचे स्वप्न पूर्णत्वास गेले आहे. जणू काही मुंगी होऊन सतत काम केलेल्या डॉ. विजया वाड यांच्या कारकिर्दीत मराठी भाषेतील हा महाप्रकल्प तडीस गेल्याने मराठी विश्वकोश कोशात न राहता विश्वात आला आहे.खंड २० (उत्तरार्ध) हा परिपूर्तीचा खंड असून हर्षवर्धन, सम्राट ते ज्ञेयवाद असा नोंदीचा प्रवास यात आहे. या उत्तरार्धात ६३६ नोंदी आणि १८ चित्रपत्रे आहेत. या खंडातील शांता हुबळीकर, सुमती क्षेत्रमाडे, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी, क्ष-किरण- वैद्यकीय, अहिल्याबाई होळकर, क्षेपणास्त्रे, हॉडुरस, ज्ञेयवाद, हाँगकाँग, होनोलुलु अशा किती तरी नोंदी वाचनीय झाल्या आहेत. चित्रपत्रे तर अतिशय आकर्षक आहेत. त्याची पहिली प्रत तर्कतीर्थांचे सुपुत्र वासुदेवशास्त्री यांनी डॉ. वाड यांच्या उपस्थितीत वाईच्या महागणपतीस नुकतीच अर्पण केली. विद्यमान अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या कारकिर्दीत खंड १७, खंड १८, १९, २० (पूर्वार्ध व उत्तरार्ध ) तयार झाले. कुमारकोश जीवसृष्टी आणि पर्यावरण भाग १, २, बोलका विश्वकोश (कुमारकोश) तसेच ब्रेलकोश तयार झाला. २२ तासांची कन्याकोशाची सीडी नामवंत निवेदकांच्या आवाजात रेकॉर्ड झाली.फक्त महानगरातच अशी भव्य भाषिक कामे होतात हा समज खोटा ठरवीत वाई सारख्या चिमुकल्या गावात विश्वकोशाचे एक ते २० खंड निर्माण झाले याचा मला अभिमान वाटतो . - डॉ. विजया वाड, अध्यक्ष, विश्वकोश निर्मिती मंडळ.विश्वकोशाच्या १८० ग्रंथवाचन स्पर्धा महाराष्ट्रभर घेऊन विद्यमान अध्यक्षांनी विश्वकोश लोकाभिमुख केला. सर्वात मोठे काम म्हणजे www.marathivishwakosh.in ही सीडॅक, पुणे यांच्या मदतीने तयार झालेली वेबसाइट. सदर वेबसाइट राज्य, राष्ट्रीय व आशियाई पुरस्कारांनी सन्मानित आहे. एमपीएससी, यूपीएससी, अन्य स्पर्धा परीक्षा यांसाठी तिचा प्रचंड उपयोग होतो. १०५ देश व १६ लक्ष वाचक या साइटला लाभले आहेत.
‘परिपूर्ती’ विश्वकोश निर्मितीच्या ज्ञानयज्ञाची
By admin | Published: June 19, 2015 1:57 AM