मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी औरंगाबादचा पवनदीप कोहली याला मुंबईत अटक करण्यात आली. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि अटकेत असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार रमेश कदम याचा तो सहकारी होता. औरंगाबाद येथे साठे महामंडळाचे स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यासाठी कदम या महामंडळाचा अध्यक्ष असताना जमीन खरेदी करण्यात आली होती. काही लाख रुपये दर असलेल्या या जमिनीपोटी कोहलीच्या खात्यात महामंडळाचे तब्बल २१ कोटी रुपये वळविण्यात आले. पैसा महामंडळाचा आणि जमिनीची खरेदी मात्र कदमच्या नावाने असाही प्रकार यात घडला. ३८५ कोटी रुपयांच्या महामंडळातील एकूण घोटाळ्यात औरंगाबादमध्ये झालेल्या या जमीन घोटाळ्यावर ‘लोकमत’ने आधीच प्रकाश टाकला होता. या जमीन घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या कोहलीची न्यायालयाने २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. (विशेष प्रतिनिधी)३ हजार अर्ज पडून : साठे महामंडळाच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्ज मिळावे यासाठीची मातंग समाज बांधवांची तब्बल ३ हजार प्रकरणे घोटाळ्यामुळे प्रलंबित आहेत. या प्रकरणांमध्ये बँका ७५ टक्के रक्कम कर्जापोटी देतात. २० टक्के वाटा महामंडळाकडून दिला जातो तर ५ टक्के रक्कम लाभार्थी देतात. २० टक्के वाट्यापोटीचे ११ कोटी रुपये देण्याची आमची तयारी आहे. या कर्जवाटपास परवानगी द्यावी, अशी विनंती महामंडळाकडून राज्य शासनास करण्यात आली आहे.
जमीन गैरव्यवहारात कोहलीला अटक
By admin | Published: February 23, 2016 12:50 AM