कोल्हापूर/ मुंबई : भाजपाचे आमदार अमोल महाडिक व शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व डॉ. सुजित मिणचेकर यांनी कडाडून विरोध केल्यामुळे, कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीची अधिसूचना काढण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढे ढकलला. यामुळे प्रस्तावित १८ गावांसह हद्दवाढ पुन्हा लटकली आहे. हद्दवाढीबाबत येत्या सोमवारी दुपारी अडीच वाजता मुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीला हद्दवाढ समर्थक आणि विरोधी कृती समितीच्या प्रत्येकी पाच सदस्यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे सांगितले. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. मंगळवारी अधिसूचनेवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरीसुद्धा केली, परंतु तीनही आमदारांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही अधिसूचना जारी केली नाही. बुधवारी तीन आमदारांनी विधानभवनाच्या दारातच उपोषण केले. आमदार राजेश क्षीरसागर हेही तेथे पोहोचले आणि अधिसूचना जारी करावी, ही मागणी घेऊन उपोषणाला बसले. दुपारी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. निर्णय सर्वांच्या सहमतीनेच घेण्यात येईल, दोन्ही बाजू ऐकून घेण्यात येतील, असे सांगत त्यातून काही मध्यमार्ग काढण्याचेही संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)समर्थनासाठी आज कोल्हापूर बंदचार आमदारांच्या उपोषणामुळे हद्दवाढीचा विषय बुधवारी विधानसभेच्या द्वारावर चांगलाच रंगला. हद्दवाढीस विरोध म्हणून प्रस्तावित १८ गावांतील लोकांनी बुधवारी बंद पाळून शहरात समाविष्ट होण्यास नकार दर्शवला, तर हद्दवाढीच्या समर्थनार्थ गुरुवारी कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे.
कोल्हापूरची हद्दवाढ लटकली!
By admin | Published: July 28, 2016 1:01 AM