कोल्हापूर - करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीला गेलेले तडे बुजवल्यानंतर हा लेप किती काळ टिकेल, हे करताना मागच्या वेळी प्रमाणे मूर्तीवरील साडेतीन वेटोळ्यांचा नाग यासह अन्य चिन्हे जाणीवपूर्वक घालवले जाणार नाही कशावरून, जुना लेप उतरविताना मूळ मूर्तीला काही इजा झाली तर तो धोका पत्करायचा का, धर्मशास्त्रानुसार मूर्तीचा अभिषेक, स्नान असे धार्मिक विधीच होणार नसतील तर हा लेपनाचा अट्टाहास कशाला, असे अनेक प्रश्न तज्ज्ञांच्या अहवालानंतर पुढे ठाकले आहेत.
तज्ज्ञांच्या अहवालात मूर्ती भक्कम करण्यासाठी ईथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे बुजवावेत. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे अखेरीला रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल, असे म्हटले आहे.
शंभर वर्षे कुठे गेले..?२०१५ पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीचे रासायनिक संवर्धन केल्यानंतर हे संवर्धन पुढील शंभर वर्षे टिकेल, असा दावा केला होता. पण सात वर्षे देखील हा लेप व्यवस्थित टिकला नाही. यासाठी वापरले गेलेले साहित्यदेखील मूळ मूर्तीच्या दगडाला जुळवून न घेणारे, निकृष्ट दर्जाचे होते, असे अहवालात नमूद आहे.
पुढे काय..?या अहवालावर २३ तारखेला सुनावणी होणार आहे. यात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पुरातत्त्व खाते, वादी, प्रतिवादी आपले म्हणणे सादर करणार आहेत. त्यावर चर्चा होऊन न्यायालय मूर्ती संदर्भात निर्णय देईल.
मूर्तीला सध्या दोन वेळा स्पंजिंग केले जाते, ते आता एकदाच करायला सांगितले आहे. स्नान तर सोडूनच द्या, किरीट सांभाळून घाला, फुलं घालू नका. जे काही सोपस्कार असतील ते उत्सव मूर्तीवर करायचे आहेत. धर्मशास्त्रानुसार मूर्तीवर काहीच करता येत नसेल तर उपयोग काय? त्यामुळे मी मूर्ती बदलाची मागणी करणार आहे.-ॲड. प्रसन्न मालेकर, मूर्ती व मंदिर अभ्यासक