नेसरी : जम्मू परिसरात अतिरेक्यांच्या गोळीबारात उत्तम बाळू भिकले (वय ३०) हे ‘२ मराठा लाईट इन्फंट्री’चे जवान शहीद झाले. शहीद भिकले हे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे गावचे सुपुत्र होते. जम्मू परिसरात दबा धरून बसलेल्या अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात उत्तम भिकले शहीद झाल्याची माहिती त्यांचे नातेवाईक असलेले सुभेदार मेजर दशरथ भिकले यांनी दिली. हे वृत्त समजताच हडलगे गावचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले. या घटनेची माहिती मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत ग्रामस्थ धडपडत होते. उत्तम यांच्या आई, वडील व पत्नीला या घटनेची माहिती दिली नव्हती. त्यांना केवळ गोळी लागून जखमी झाल्याची माहिती घरच्यांना दिली होती. उत्तम हे २००२ मध्ये कोल्हापूर येथील २ मराठा इन्फंट्री, कोल्हापूर येथे भरती झाले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हडलगे येथे, तर बारावीपर्यंतचे शिक्षण नेसरी येथील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये झाले होते. एप्रिल महिन्यात ते गावी सुटीवर आले होते. २० एप्रिलला ते पुन्हा जम्मूकडे सेवा बजावण्यास गेले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्र्षांची मुलगी, भाऊ, बहीण व भावजय असा परिवार आहे. (प्रतिनिधी) देशासाठी १२ वर्षे सेवा जवान उत्तम भिकले यांनी १२ वर्षे देशसेवा बजावली. त्यांनी हिमाचल प्रदेशात दोन वर्षे, पंजाबमध्ये दोन वर्षे, तर काश्मीरमध्ये ८ वर्षे सेवा बजावली.
आठवणींना उजाळा...
उत्तम भिकले अतिशय मनमिळावू व प्रेमळ होते. सारा गाव उत्तमच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत असून शत्रूशी लढताना वीरमरण झालेल्या या लाडक्या जवानाच्या आठवणींना उजाळा देत होते.