ऑनलाइन लोकमत -
पोलिसांचा थरारक पाठलाग : भिंतीवरून उडय़ा मारून पळणा-या चौघांना अटक
कोल्हापूर, दि. 16 - पुण्यातील मारणे गँगचा शिक्षा भोगत असलेला गुंड सोमप्रशांत मधुकर पाटील (वय 44, रा. बाणोर, बालेवाडी रोड, पुणो) याला पळवून नेण्याचा प्रयत्न लक्ष्मीपुरी पोलिसांनी हाणून पाडला. पोलिसांनी पाठलाग करून पाटीलसह कोल्हापुरातील त्याच्या चार सहका-यांना अटक केली.
अभिजीत शरद चव्हाण (वय 26, रा. राजारामपुरी), दिग्विजय शिवाजीराव पोवार (वय 37, रा. सनसिटी, न्यू पॅलेस), संजय दिनेश कदम (वय 52, रा. राजारामपुरी) व जगदीश प्रभाकर बाबर (वय 44, रा. सुभाषरोड, मंडलिक वसाहत) अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री साडेअकरा वाजता सीपीआर परिसरात घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली.
याप्रकाराबाबत लक्ष्मीपुरी पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की पुण्यातील कुप्रसिद्ध मारणे गँगचा गुंड सोमप्रशांत पाटील हा कळंबा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला कोल्हापुरातून पोलिसांच्या तावडीतून पळवून नेण्याची योजना त्यांच्या सहका-यांनी आखली होती. या योजनेनुसार पाटील याने आजारी पडायचे किंवा आजारी असल्याचा बहाणा करून सीपीआरमध्ये दाखल व्हायचे ठरले होते. त्यानुसार पाटील सीपीआरच्या कैद्यांच्या उपचार कक्षात उपचार घेत होता; परंतु तत्पूर्वीच पाटील याच्या योजनेची लक्ष्मीपुरी पोलिसांना खब-याकडून टिप मिळाली होती. त्यामुळे पोलिस त्याच्या सहका-यांच्या मागावरच होते.
रात्री साडेअकरा वाजता लक्ष्मीपुरी पोलिसांनी सीपीआरच्या कैदी कक्षात छापा टाकला असता सोमप्रशांत पाटील याच्यासह अभिजीत चव्हाण, दिग्विजय पोवार, संजय कदम व जगदीश बाबर हे जेवण व दारू पित होते. पोलिसांना पाहताच त्यांनी तेथील कक्षातून सतरा फूट भिंतीवरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले व अटकेची कारवाई केली. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, पोलिस उपनिरीक्षक युवराज आठरे व त्यांचे सहकारी एस. डी. सावतेकर, अभिजीत घाटगे, विजय देसाई, अजय वाडीकर व अबिद शेख यांनी ही कारवाई केली.
मारणे गँगचे कोल्हापूर कनेक्शन
मारणे गँगच्या सोमप्रशांत पाटील याला पळवून नेण्याच्या कटात अटक केलेले सर्व संशयित हे कोल्हापुरातील आहेत. मारणे गँगने सुपारी देऊन त्यांच्यावर ही कामगिरी सोपविली होती की, त्याचे अपहरण करण्यामागे अन्य कोणते कारण होते, याचा तपास पोलिस आता करणार आहेत. त्यातून मारणे गँगचे कोल्हापुरचे कनेक्शन उघड होण्याची शक्यता आहे.