पुणे - Sharad Pawar on Sanjay Mandalik ( Marathi News ) कोल्हापूरात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआ उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे नवा वाद झाला आहे. आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं विधान मंडलिक यांनी केले. त्यावर शरद पवारांनी राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही असं भाष्य केले आहे.
पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, अनेक राजघराण्यामध्ये दत्तक ही गोष्ट नवी नाही. त्यांच्यावर भाष्य केलं म्हणजे विरोधकांनी किती खालची पातळी गाठली ते पाहावं. मूळ शाहू महाराजांचा सेवेचा गुण होता, तीच भूमिका आत्ताच्या शाहू महाराजांनी घेतली आहे. अशा व्यक्तिमत्वावर टीका केली जात आहे. यातून विरोधकांची मानसिकता दिसून येत आहे असा टोला शरद पवारांनी लगावला.
काय आहे वाद?
गडहिंग्लज येथे बुधवारी झालेल्या प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू छत्रपतींवर भाष्य केले. माझे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी खऱ्या अर्थाने पुरोगामी विचार जपला. आखाड्यात उतरल्यानंतर विरोधी मल्लाला हातच लावायचा नाही. त्या मल्लाला टांगच मारायची नाही. मग कुस्ती तरी कशी होणार अशी विचारणा करत मंडलिक यांनी ही आक्रमक भूमिका घेत आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
संजय राऊतांनी मंडलिकांना फटकारलं
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेला नितांत आदर आहे. छत्रपतींच्या गादीवर ते विराजमान आहेत. गादीचा अपमान जर कोणी करत असेल तर महाराष्ट्र ते सहन करणार नाही. शाहू महाराजांनी या महाराष्ट्राला सामाजिक दिशा देण्याचा प्रयत्न केला त्या गादीचे ते वारसदार आहेत. छत्रपती शाहूंच्या गादीचा मान राखायचा नाही तर काय मोदींच्या गादीचा मान राखायचा का? असं यांना वाटतंय का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
त्याचसोबत डुप्लिकेट शिवसेनेने सर्व ताळतंत्र सोडलं आहे आता ते छत्रपती शाहू महाराजांपर्यंत पोहोचले. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळे ते बोलत आहेत ते योग्य नाही. छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि जे ज्यांनी वक्तव्य केले ते डुप्लिकेट शिवसेनेचे उमेदवार आहेत. संजय मंडलिक हे डुप्लिकेट माल आहेत, त्यांना कोल्हापूरची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराजांची गादी आहे, त्या गादीविषयी सर्वांनी सन्मान ठेवला पाहिजे अशा शब्दात राऊतांनी संजय मंडलिकांना फटकारलं.