कोल्हापूर : एकाच घरात राहायचे आणि आरोप करायचे, हे शिवसेनेचे वर्तन योग्य नाही. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य पातळीवरून युतीचा फेरविचार झाला तरी, या आरोप करणाऱ्या शिवसेनेशी आपले जमणार नाही, अशी ठाम भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत घेतली.ताराराणी आघाडीसमवेत जाण्याचा निर्णय, स्वबळ आणि आरक्षण आदी मुद्द्यांवरून शिवसेनेने भाजपावर आरोप-टीका केली आहे. त्याअनुषंगाने भविष्यात राज्य पातळीवर युतीबाबत फेरविचार झाला तयार कोल्हापुरात भाजपा काय करणार, असे विचारले असता पाटील म्हणाले, काळाच्या ओघात काय होईल हे सांगता येत नाही. मात्र, फेरविचार झाला, तरी भाजपाचे शिवसेनेशी जमणार नाही. सध्या तरी, भाजपा-ताराराणी आघाडी-स्वाभिमानी-रिपाइं ही आघाडी सक्षमपणे निवडणूक लढविणार आहे.आम्हाला कोल्हापूर शहरात निवडणूक लढविताना ताराराणी आघाडी चांगली वाटली, म्हणूनच त्यांच्यासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोणाच्या पाठीत आम्हीखंजीर खुपसण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी स्पष्टकेले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर मनपात सेनेशी जमणार नाही
By admin | Published: August 10, 2015 12:50 AM