कोल्हापूर : रूग्णाला काय लागते ते ओळखून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती एकाच छताखाली उपलब्ध व्हावी. या स्वरूपातील चिकित्सा पद्धती प्रामुख्याने ग्रामीण भागासाठी असावी. देशाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी औषधे ही भारतीय उत्पादकांकडून घ्या. परदेशी औषधांचे आकर्षण सोडून द्या, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरूवारी येथे केले.कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील नव्या न्युरोनेव्हिगेशन सिस्टीम या प्रणालीच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. हॉस्पिटल परिसरातील या कार्यक्रमास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह भागैय्या, प्रांतचालक नानाजी जाधव, धर्मादाय उपायुक्त शशिकांत हेर्लेकर, अखिल भारतीय ग्रामविकास प्रकल्पाचे प्रमुख दिनेश प्रमुख उपस्थित होते.
सरसंघचालक भागवत म्हणाले, अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे आता आरोग्य आणि शिक्षण निकडीचे बनले आहे. आरोग्य सुविधा, वैद्यकीय शिक्षण खर्चिक बनले आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी झालेला खर्चाच्या तुलनेत कमाई करण्यासाठी अनेकजण शहरात जावून रूग्णालय, दवाखाने सुरू करतात. त्यामुळे ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सुविधा मिळत नाहीत. अशा स्थितीत उपचारपद्धतीचा अभिनिवेष सोडून देऊन ज्या विविध उपचारपद्धती उपलब्ध आहेत. त्या एकाच छताखाली आणून बहुउपचारवादी चिकित्सा पद्धती ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
उत्तम आणि स्वस्त औषधे आपला देश जगाला देतो. त्याला जनतेने प्रतिसाद द्यावा. महाग पडत असतील, तरी भारतीय उत्पादकांकडूनच औषध घ्यावीत. सहसरकार्यवाह भागैय्या म्हणाले, सिद्धगिरी मठ हा समाजाला जागृत करण्याचे काम करीत आहे. जीवनाला योग्य दिशा देण्याची साधना येथे होत आहे. वैद्यकीय सेवाही समाजाची आराधना आहे.
या कार्यक्रमात न्युरोनेव्हिगेशन सिस्टीमचे लोकार्पण प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. दिग्विजय मोहिते या रूग्णाचे वडील लक्ष्मण यांनी मनोगत व्यक्त केले. या हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या ५० लहान मुलांना भेटवस्तू देण्यात आल्या. मेंदू सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी प्रास्ताविक केले. अक्षय नलवडे-जहागिरदार यांनी सूत्रसंचालन केले. मेंदू भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर यांनी आभार मानले.
‘वेलनेस’ चा विचार व्हावाआजार, औषधांसह ‘ईलनेस’चा विचार आज बहुतेक उपचार पद्धतीत होत आहे. त्याऐवजी ‘वेलनेस’चा विचार व्हावा. आजार होवू नये यासाठी युक्त आहार, विहार आवश्यक आहे.