कोल्हापूर: काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये मोठी आघाडी घेणाऱ्या काँग्रेसचं मताधिक्य हळूहळू कमी होताना दिसत आहे. सातव्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव साडे नऊ हजारपेक्षा अधिक मतांना आघाडीवर होत्या. आता त्यांचं मताधिक्य ८ हजारांवर आलं आहे. मतमोजणीच्या तीन फेऱ्यांमध्ये भाजप उमेदवार सत्यजित कदम पुढे आहेत. आठव्या, नवव्या, फेरीत कदम यांना जाधवांपेक्षा अधिक मतं मिळाली आहेत.
आठव्या फेरीपासून कदम यांना जाधव यांच्यापेक्षा जास्त मतं मिळताना दिसत आहेत. सातव्या फेरीत जाधव यांना १२०० मतं अधिक होती. त्यांच्याकडे एकूण ९ हजार ६७६ मतांची आघाडी होती. आठव्या फेरीत कदम यांनी ही आघाडी ५२४ मतांनी कमी केली. नवव्या फेरीतही कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांचं मताधिक्य ९ हजारांच्या खाली आलं. दहाव्या फेरीत कदम यांना ३ हजार ७९४ मतं मिळाली, तर जाधव यांना २ हजार ८६८ मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांचं मताधिक्य ८ हजार ७३ वर आलं आहे. हाच ट्रेंड कायम राहिल्यास उत्तर कोल्हापुरात काँग्रेसला धक्का बसू शकतो.कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील ३५८ मतदान यंत्रांतील मतमोजणीचे केलेले नियोजन पाहता आज, शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आरोपप्रत्यारोपाने उडालेला धुरळा, भाजपाने शेवटच्या टप्प्यात आणलेला हिंदुत्वाचा मुद्दा, यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. या ठिकाणी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात आहे.मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्ष, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरात प्रतिनिधी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंडपही उभारण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.