कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.
कोल्हापूर उत्तरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे. मात्र २०१९ मध्ये या ठिकाणी काँग्रेसचे चंद्रकांत जाधव विजयी झाले. त्यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. त्याआधी क्षीरसागर दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळेच जाधव यांच्या निधनानंतर जाहीर झालेली पोटनिवडणूक लढवण्यास क्षीरसागर उत्सुक होते. मात्र आघाडीचा धर्म पाळत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारसंघावर दावा केला नाही.
काँग्रेसचे दिवंगत आमदार जयश्री जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. मात्र हक्काचा मतदारसंघ काँग्रेसला दिल्याची भावना शिवसैनिकांमध्ये होती. राजेश क्षीरसागर नाराज असल्याची चर्चा होती. क्षीरसागर मुंबईला येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेऊन गेले. सर्वशक्तिनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरा आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून आणा, असा आदेश मातोश्रीवरून शिवसैनिकांना देण्यात आला होता.
कडवे शिवसैनिक काँग्रेसला मतदान करतील, असा प्रश्न होता. राजेश क्षीरसागर यांचं प्राबल्य असलेल्या भागांमध्ये शिवसैनिक काय करणार, त्यांची मतं भाजपला जाणार का, असे प्रश्न राजकीय वर्तुळातील अनेकांना पडले. सिद्धार्थ नगर, खोलखंडोबा, बुधवार तालीम, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका परिसरात राजेश क्षीरसागर यांचा उत्तम प्रभाव आहे. या ठिकाणी जयश्री जाधवांना आघाडी मिळाल्याचं आकडेवारी सांगते.
सिद्धार्थनगर, पंचगंगा तालीम, खोल खंडोबा परिसरातून जयश्री जाधव यांना ३ हजार ७८८ मतं मिळाली. तर सत्यजीत कदम यांना २ हजार ५६ मतं मिळाली. अकबर मोहल्ला, टाऊन हॉल, बुरुड गल्ली, शुक्रवार पेठ, तोरसकर चौक भागातून जाधव यांना ३ हजार ७५६ इतकं मतदान झालं. तर कदमांना २ हजार ६६९ मतं मिळाली.