Kolhapur North By Election Result: ऐतिहासिक निकाल लागणार! उत्तर कोल्हापूरात ५० वर्षांत कधीच घडलं, ते यंदा घडणार; जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:56 PM2022-04-16T12:56:23+5:302022-04-16T12:57:27+5:30
Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांकडे मोठी आघाडी;
कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात निवडणूक झाली. आज याठिकाणी मतमोजणी होत आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये आघाडी घेणाऱ्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचं मताधिक्य आता १५ हजारांच्या पुढे गेलं आहे. मतमोजणीच्या २२ व्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे जाधव यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
भाजपचे सत्यजीत कदम यांनी मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये अधिक मतं घेतली. आठव्या, नवव्या, दहाव्या फेरीत कदमांना अधिक मतं मिळाली. मात्र त्यानंतरच्या सगळ्या फेऱ्यांमध्ये जाधवांनी जास्त मतं घेत आघाडी वाढवत नेली. २२ फेऱ्यांनंतर जाधव यांच्या पारड्यात ८३,३३८ मतं आहेत. तर कदमांना ६७,८१३ मतं मिळाली आहेत. त्यामुळे काँग्रेस कोल्हापूर उत्तर राखणार हे स्पष्ट झालं आहे.
पहिल्यांदाच महिला आमदार मिळणार
उत्तर कोल्हापूर मतदारसंघानं आतापर्यंत ९ आमदार पाहिले. पैकी दोन जण प्रत्येकी दोनदा निवडून आले. मात्र कोल्हापूर उत्तरमधून एकदाही महिला उमेदवार विजयी झालेली नाही. त्यामुळे जयश्री जाधव यांचा विजय ऐतिहासिक असेल. विधानसभेत पहिल्यांदाच उत्तर कोल्हापूरचं प्रतिनिधीत्व महिला करताना दिसेल.
कोण किती साली जिंकले
१९७२ : त्र्यं. सी. कारखानीस(शेकाप)
१९७८ : रवींद्र सबनीस (जनता पक्ष)
१९८० : लालासाहेब यादव (काँग्रेस)
१९८५ : प्रा. एन. डी. पाटील (शेकाप)
१९९० : दिलीप देसाई (शिवसेना)
१९९५ : सुरेश साळोखे (शिवसेना)
१९९९ : सुरेश साळोखे (शिवसेना)
२००४ : मालोजीराजे छत्रपती (काँग्रेस)
२००९ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
२०१४ : राजेश क्षीरसागर (शिवसेना)
२०१९ : चंद्रकांत जाधव (काँग्रेस)
क्षीरसागरांची नाराजी दूर करण्यात यश
कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेला पाचवेळा यश मिळालं आहे. २००९ ते २०१९ या कालावधीत शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांनी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. मात्र २०१९ मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी त्यांचा पराभव केला. जाधव यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. क्षीरसागर निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र २०१९ मध्ये इथे काँग्रेसचा उमेदवार विजयी झाल्यानं या मतदारसंघात काँग्रेसनंच उमेदवार दिला. क्षीरसागर आणि शिवसैनिकांची नाराजी हा कळीचा मुद्दा होता. मात्र जाधव यांना मिळालेली आघाडी पाहता हा विषय निकाली निघाल्याचं दिसत आहे.