कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेला कोल्हापूर विधानसभा मतदारसंघ कोणाकडे हे अवघ्या काही तासांत स्पष्ट होईल. मतमोजणीला सुरुवात झाली असून जाधव यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या उमेदवार आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये काँग्रेसनं सुस्साट कामगिरी केली. मात्र चौथ्या, पाचव्या फेरीत भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना अधिक मतं मिळाली. त्यामुळे जाधव यांची आघाडी कमी झाली. मात्र सहाव्या फेरीत जाधव यांनी पुन्हा कदम यांना मागे टाकलं. त्यामुळे इथे चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. सध्या जयश्री जाधव यांना २७ हजार ३७० मतं मिळाली आहेत. त्यांच्याकडे ८ हजारहून अधिक मतांची आघाडी आहे.कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीतील ३५८ मतदान यंत्रांतील मतमोजणीचे केलेले नियोजन पाहता आज, शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. प्रचाराची घसरलेली पातळी, आरोपप्रत्यारोपाने उडालेला धुरळा, भाजपाने शेवटच्या टप्प्यात आणलेला हिंदुत्वाचा मुद्दा, यामुळे ही निवडणूक कमालीची चुरशीची झाली होती. या ठिकाणी एकूण पंधरा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र खरी लढत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव विरुद्ध भाजपाचे सत्यजित कदम यांच्यात आहे.
मतमोजणीसाठी अधिकारी व कर्मचारी मिळून ७६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक याप्रमाणे उमेदवारांच्या मतमोजणी प्रतिनिधींना प्रवेश दिला जाईल. मतमोजणी कक्ष, तसेच बाहेरील परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत, तसेच परिसरात प्रतिनिधी, अधिकाऱ्यांना बसण्यासाठी मंडपही उभारण्यात आले आहेत. मतमोजणीदरम्यान परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यासाठी राज्य व केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे.
कुणी कुठे थांबायचे..?मतमोजणीच्या काळात, तसेच निकाल लागल्यानंतर काही गडबड गोंधळ होऊ नये, याची खबरदारी घेताना पोलिसांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी थांबण्यास सांगितले आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना रजपूतवाडी एचपी गॅस गोडाऊनजवळ, भाजपाच्या कार्यकर्त्यांना शिवाजी विद्यापीठ यूथ बँकेजवळ, तर वंचित आघाडीसह अन्य उमेदवारांना शिवाजी विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाजवळ थांबण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.