Kolhapur North By Election Result: काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली; भाजपानं सांगितलं ‘मतांचे गणित’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:44 PM2022-04-16T14:44:47+5:302022-04-16T17:40:04+5:30
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे असं भाजपाने म्हटलं आहे.
मुंबई – मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारली आहे. १८ हजारांहून अधिक मताधिक्याने महाविकास आघाडीने या मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला आहे. याठिकाणी भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. परंतु या पोटनिवडणुकीत शिवसेनेची मते फुटली अशी चर्चा सुरू झाली आहे.
भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) म्हणाले की, कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत जयश्री जाधव यांचा विजय झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष विरुद्ध भाजपा एकटी लढली तरी जवळपास ७७ हजार मते मिळवली. परंतु मतांचे गणित पाहायला गेले तर २०१४ मध्ये शिवसेनेला ६९ हजार आणि २०१९ मध्ये शिवसेना-भाजपा मिळून ७५ हजार मते पडली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसला ४७ हजार, राष्ट्रवादीला १० हजार मते पडली होती. तर २०१९ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून ९१ हजार मते मिळाली होती असं त्यांनी सांगितले.
मग कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये फूट पडल्याचं उघडपणे दिसत आहे. शिवसेनेची हक्काची ४० ते ६० हजार मतदान असताना तिन्ही पक्षांची मिळून ९६ हजार मते आहेत. तर भाजपाची एकट्याची ७७ हजार मते आहेत. याचा अर्थ शिवसेनेच्या मतांमध्ये फूट असून हिंदुत्ववादी जनतेने शिवसेनेला नाकारलं आहे. आणि हो, या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा EVM वरील विश्वास वाढेल ही अपेक्षा आहे असा टोला लगावत काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली पण शिवसेना हरली असं विधान भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले आहे.
..तर हिमालयात जाईन बोललो होतो
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवण्यास सुरूवात केली आहे. चंद्रकांत पाटील यांचा निवडणुकीपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात कोल्हापूरच्या कुठल्याही जागेवर पोटनिवडणूक घ्या, जिंकलो नाही तर हिमालयात जाईन असं म्हटलं होते. त्यावर पुन्हा भाष्य करत चंद्रकांत पाटील(BJP Chandrakant Patil) म्हणाले की, मी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं म्हटलं होतं. आमचे नाना कदम लढले तर तुमच्या तोंडाला फेस आला, मी लढलो नाही असं सांगत महाविकास आघाडीच्या नेत्यांना चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे. ज्या झाडाला चांगले आंबे असतात त्यालाच दगडं मारली जाते. चंद्रकांत पाटील लढले असते तर तुम्हाला कुणाला उभं करायचा हा प्रश्न निर्माण झाला असता. संघटना उत्तमपणे निवडणूक लढली असं चंद्रकांत पाटलांनी सांगितले आहे.