Kolhapur North By Election Result: काँग्रेसच्या जयश्री जाधवांनी पतीची जागा राखली; पण करुणा धनंजय मुंडेंना किती मतं पडली?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 02:26 PM2022-04-16T14:26:30+5:302022-04-16T14:27:01+5:30
Kolhapur North By Election Result: 'धनंजय मुंडेंकडून मला मारण्याचा प्रयत्न होईल', असा दावा करुणा मुंडेंनी केला होता
कोल्हापूर: काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानं रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसनं विजय मिळवला आहे. जाधव यांच्या पत्नी जयश्री यांनी जवळपास १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनीदेखील उत्तर कोल्हापूरातून निवडणूक लढवली होती. त्यांना किती मतं मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. मतमोजणीच्या एकूण २६ फेऱ्या होत्या. २६ व्या फेरीनंतर करुणा मुंडेंना एकूण १३३ मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे मुंडपेंक्षा अधिक मतं नोटाला मिळाली. नोटाचा पर्याय एकूण १ हजार ७८८ जणांनी निवडला.
कोणाला किती मतं?
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात होते. मात्र मुख्य लढत काँग्रेसच्या जयश्री जाधव आणि भाजपच्या सत्यजीत कदम यांच्यामध्ये झाली. जाधव, कदम यांच्यानंतर सर्वाधिक पसंती नोटाला मिळाली. दोन उमेदवार सोडल्यास अन्य कोणालाही हजारपेक्षा अधिक मतं मिळवता आली नाहीत..
प्रचारावेळी काय म्हणाल्या होत्या करुणा मुंडे?
गेल्या शनिवारी करुणा मुंडेंनी कोल्हापुरात एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले. माझ्याबाजूनं मतदारांचा कौल आहे हे लक्षात आल्यानं मला मारण्याचा प्रयत्न झाला आहे. पुढील काळात माझ्यावर आणि कार्यकर्त्यांवर हल्ला झाला, काही बरं वाईट झाल्यास मंत्री धनंजय मुंडे व महाविकास आघाडी सरकारला जबाबदार धरण्यात यावं, असं मुंडे म्हणाल्या होत्या.