- संदीप आडनाईक कोल्हापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या कोल्हापूर दौऱ्याची माहिती मिळताच त्यांना गावबंदी केल्याची माहिती देण्यासाठी जमलेल्या कोल्हापूरातील सकल मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
मुख्यमंत्री शिंदे शनिवारी रात्री अचानक कोल्हापुरात आले. ते कणेरी मठावर येणार असल्याची माहिती मिळताच त्यांना मराठा समाजाने गावबंदी केल्याची माहिती आणि समज देण्यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तत्काळ राजारामपुरी पोलिस ठाण्यासमोर एकत्र आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल समजताच पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करुन मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली. कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण मिळालेच पाहिजे, मराठा समाजाला फसवणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या. मंत्री हसन मुश्रीफ यांना मराठा आरक्षण आंदोलकांनी अडवल्याने शिंदे यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळली होती.
या आंदोलनात सकल मराठा समाजाचे वसंत मुळीक, ॲड. बाबा इंदुलकर, विजय देवणे, दिलीप देसाई, बाबा पार्टे, सुभाष जाधव, संजय जाधव, काका जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रसाद जाधव, कमलाकर जगदाळे, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, अनुप पाटील, अमर निंबाळकर, संजय पवार, दिनेश कुकडोळकर, विजय घाटगे निंबाळकर, दीपक निंबाळकर, जयसिंग भोसले, बाळासाहेब जितकर, संजय काटकर, अजित काटकर, चंद्रकांत जाधव, सागर धनवडे यांच्यासह मराठा समाजातील सर्व संघटना आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.